एकल महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

एकल

अकोला : साऊ एकल समिती महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि एकल महिलांचा सन्मान व सामाजिक सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने अकोल्यात हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. साऊ एकल समिती महाराष्ट्रचे निमंत्रक श्री. हेरब कुलकर्णी तसेच अकोला जिल्हा समन्वयक तुषार हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, साऊ एकल समितीच्या सक्रिय कार्यकर्त्या श्रीमती अनिता काळबांडे यांनी दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.

हा हळदीकुंकू समारंभ एकल महिलांचा समावेश करून मोठ्या आनंदात, हर्ष-उल्हासात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि सन्मानाची भावना स्पष्टपणे दिसून येत होती. हास्याचे फुलारे फुलवत पार पडलेल्या या कार्यक्रमाने सामाजिक समतेचा सकारात्मक संदेश दिला.

कार्यक्रमाला समता परिषद विदर्भ अध्यक्षा सौ. मायाताई इरतकर, माळी महासंघ महिला आघाडी अध्यक्षा प्रा. कल्पनाताई तायडे, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षा उमरी येथील सौ. शारदाताई धनोकार, सौ. प्रणिताताई सम्रीतकार, श्रीमती छायाताई हाडोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ॲड. सविता खोटरे यांनी महिलांना कायदे, हक्क व संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली.

या समारंभाला साऊ एकल समितीच्या सदस्या ममता जेरेपोतवार, नयना वानखडे, कल्पना इंगळे, प्रांजली वारोकार, दिपाली पंडित, काजोल वाघमारे यांच्यासह इतर अनेक एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे एकल महिलांना सामाजिक स्वीकार, सन्मान आणि एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

read also :  https://ajinkyabharat.com/vidarbha-talathi-sangh-aggressive-garden-amaravati-virata-dharna-movement/