शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार

शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार

लोणार – प्रतिनिधी
दिनांक – १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अँड. दीपक मापारी यांच्याजागी राजेश बुधवत यांची तालुका प्रमुखपदी अचानक झालेली नियुक्ती ही केवळ एक साधी संघटनात्मक फेरबदल नसून, पक्षातील अंतर्गत राजकीय संघर्षाचा परिपाक मानली जात आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने विधानसभेसाठी सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी मिळाल्यानंतर, तालुक्यातील संघटनात्मक व्यवस्थापनात मोठी विस्कळीतता निर्माण झाली. अँड. दीपक मापारी हे त्या वेळी तालुका प्रमुखपदी कार्यरत असतानाही त्यांना पक्ष उमेदवाराने पुरेसा सन्मान दिला नाही, ही नाराजी त्यांच्या भूमिकेतून दिसून आली. परिणामी, शिवसेनेच्या (उबाठा) गोटात खरात समर्थक आणि मापारी समर्थक असे दोन गट स्पष्टपणे उभे राहिले.

या दोन गटांतील संघर्ष विधानसभेच्या आधीपासूनच स्पष्ट होता. अँड. मापारी यांनी विरोधी गटाचे नेतृत्व करत, सिद्धार्थ खरात यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यांच्या या भूमिकेमुळेच पुढे पक्षातील गटबाजी तीव्र झाली. खरात यांनी आपले राजकीय वजन वापरून मापारी यांना हटवण्यास यश मिळवले असले तरी त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Related News

हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, शिंदे गटाच्या उदयानंतर शिवसेनेच्या (उबाठा) तालुका संघटनेला पुन्हा उभारी देण्याचे श्रेय अँड. मापारी यांनाच जाते. त्यांनी नव्या तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाची पुनर्बांधणी केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी संघटनेपासून अलिप्तता पत्करली.

आता त्यांच्याजागी राजेश बुधवत यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवत यांना संघटनात्मक अनुभव असला तरी पक्षातील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांना नेतृत्व स्वीकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मापारी समर्थक कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि पक्षातील गटबाजी कमी करणे, हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

आगामी नगरपालिका , जिल्हापरिष आणि पंचायत समित्यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उबाठा) गोटातील ही फूट पक्षासाठी घातक ठरू शकते. जर नेतृत्वाने योग्य वेळेत समेट साधला नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा ओघ अधिक वाढू शकतो. त्यामुळे हे नेतृत्वबदल पक्षासाठी वरदान ठरेल की अभिशाप, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल.

Related News