शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा

गरजू शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ; मत्स्य व्यवसायालाही चालना

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. लवकरच कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी होणार असून, यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, मोठ्या फार्महाऊसचे मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येईल.

संसाधन बळकटीवर भर

सरकारने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत, यासाठी शेतीशी संबंधित संसाधनांना बळ देण्याची तयारी केली आहे. शेततळ्यांमुळे सिंचनात आणि उत्पन्नात वाढ झाल्याने मत्स्य व्यवसायालाही कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला आहे.

मत्स्य व्यवसायाचा विकास

सध्या महाराष्ट्र गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात १६व्या क्रमांकावर आहे. मात्र २०२९ पर्यंत पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळेल, असा विश्वास मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. केंद्राच्या ‘नीलक्रांती’ योजनेतून मोठा निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

मोर्शीत मत्स्य विज्ञान महाविद्यालय

मोर्शी येथे २०२ कोटींचा खर्च करून मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत ते पूर्ण होईल आणि ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.