विषारी औषध प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

साखरखेर्डा : येथुन जवळच असलेल्या शिंदी येथील एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.  अनिल सुभाष येरमुले असे आत्म्हत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदी येथील अनिल सुभाष येरमुले हे सायंकाळी जेवण करून बाहेर गेले होते. ते परत आले नाही, सकाळी सात वाजेच्या सुमारास नितीन येरमुले हे कपाशीच्या प्लॉटिंगसाठी गुलाबराव बेलोडे यांच्या शेतात गेले असता अनिल येरमुले तेथे मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेवुन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात हलविला. गुलाबराव बेलोडे यांची शेती ते बटाईने करीत होते. परंतु यंदा झालेल्या पावसामुळे फुले लागलेल्या कपाशीला मोठा फटका बसला. उत्पादनात होणारी संभाव्य घट आणि आर्थिक घडी बिघडण्याच्या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा शिंदी गाव परिसरात आहे. मृतक अनिल येरमुले यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन मुले, एक मुलगी, पत्नी, भाऊ असा आप्त परिवार आहे.