अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी, त्वरीत निधी जमा करण्याची मागणी
अकोट: अकोट तालुक्यातील अकोलखेड, उमरा, पणज या मंडळांमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी
आपल्या खात्यात अद्यापही अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने आज तहसील कार्यालयावर धडक आंदोलन केले.
या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत शासनाने त्वरित अनुदान जमा करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
गेल्या महिन्याभरापूर्वी कृषी सहायक आणि तलाठ्यांनी
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची याद्या तयार करून नुकसान भरपाईसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती.
संबंधित शेतकऱ्यांनी अंगठा लावून आवश्यक कार्यवाही पूर्ण केली
, मात्र अद्यापही अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली नाही.
शिवसेना उबाठा गटाचा आंदोलनाचा इशारा
शेतकऱ्यांचे अनुदान रखडल्याने नाराज झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गटाच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा न केल्यास तहसील
कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उबाठा गटाने दिला आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी
शासन 31 मार्चपूर्वी कर्ज परतफेडीसाठी शेतकऱ्यांवर तगादा लावते, मात्र शेतकऱ्यांना
मिळणाऱ्या अनुदानासाठी दिरंगाई का केली जाते, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात आदिवासी तालुका अध्यक्ष सुभाष सुरतने,
माजी सरपंच किशोर पाटील बोंद्रे, नंदू बोंद्रे, सुधीर भील, अरुण चामलाटे, अमोल मोहोड,
देवानंद खिरकर, छोटू घोरड, राहुल पाचडे, निलेश सोनटक्के, राजसिंग भोसले, रामरतन तोटे
यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.