अकोला जिल्ह्यातील पातुर नंदापूर मरीआई मंदिर हे श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्रस्थान मानलं जातं. शेकडो वर्षांपासून चालत आलेली पारंपरिक पूजा-अर्चा, नियम आणि हप्त्याची परंपरा आजही गावकरी तितक्याच श्रद्धेने पाळत आहेत. गावाबाहेर वसलेल्या मरीआईच्या मंदिरात वर्षभर दीप आरती केली जाते. विशेष म्हणजे नवरात्रीत नऊ दिवस पूजा-पाठ आणि आरती नित्यनेमाने केली जाते. या काळात गावकऱ्यांनी पाळलेले नियम आणि त्याग पाहून श्रद्धाळूंना आश्चर्य वाटतं. गौरी आगमनाच्या दिवसापासूनच गावात “हप्त्याला” सुरुवात होते. एक महिन्याच्या कालावधीत गावात मांसाहारावर बंदी असते. इतकेच नव्हे तर या काळात ,कोणत्याही घरात कढईमध्ये तळण काढले जात नाही ,नवीन कपडे वापरणे टाळले जाते ,घरातील सुना माहेरी जात नाहीत, तसेच मुली माहेरी आणल्या जात नाहीत गावकरी या परंपरेचे काटेकोर पालन करतात आणि यामध्ये कोणतीही तडजोड करत नाहीत. नवरात्रीत गावातील बहुसंख्य नागरिक उपवास करतात. नवमीच्या दिवशी उत्तमराव गवळी यांच्या हस्ते मरीआईची मनाची पूजा होते. या पूजेच्या दिवशी हप्त्याची समाप्ती होते आणि गावकऱ्यांना या कडक नियमांतून सुटका मिळते. गावातील वयोवृद्ध नागरिकांचे म्हणणे आहे, की “या कठोर हप्त्यामुळेच गावावर मरीआईची कृपा आहे. गावात कधीही मोठं संकट आलं नाही.” आजच्या आधुनिक काळात संस्कृती, सभ्यता आणि पारंपरिक रूढींचा विसर पडत असताना, नंदापूर गावातील नागरिक ही शेकडो वर्षांची परंपरा आजही जपत आहेत. नवीन पिढीने या संस्कृतीचं जतन करणं हीच खरी भक्ती असल्याचं गावकऱ्यांचं मत आहे. पातुर नंदापूर गावातील मरीआईवरील श्रद्धा आणि परंपरेचं पालन ही आजच्या धावपळीच्या युगातही संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे. भक्ती, श्रद्धा आणि नियम यांचा संगम असलेली ही परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
स्थान: पातुर नंदापूर
मुख्य आकर्षण: मरीआई मंदिरातील नवरात्र हप्त्याची परंपरा
कालावधी: गौरी आगमनापासून नवमीपर्यंत
read also:https://ajinkyabharat.com/ola-dukh-jaheer-karanyachi-magani-2/
