प्रतिनिधी | लोणार
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या शेगाव–पंढरपूर पालखी मार्गाची
अवस्था पुन्हा एकदा चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे.
लोणार आणि मेहकर तालुक्यातील रस्त्यांवर खोल खड्डे, मोठमोठ्या भेगा आणि तडे पडल्याने
वारकऱ्यांचे प्राण धोक्यात आले आहेत. शासनाकडून लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला मार्गच आता जीवघेणा ठरत आहे!
धोकादायक रस्त्यांवरून पालखी मार्गस्थ?
सुलतानपूर, लोणार, मेहकर या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांचा मध्यभागच कोसळला आहे.
सीता न्हाणी नदीवरील पुलावरचे खड्डे तर खासगी वाहनचालकांसाठी अपघाताचे निमित्त बनत आहेत.
दुचाकीस्वार जर थोडाही असावध झाला, तर गंभीर अपघात अटळ आहे.
थातूरमातूर डागडुजीचं भांडं पुन्हा फूटलं!
मागील वर्षी संत गजानन महाराज पालखीच्या आगमनापूर्वी याच रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले होते,
मात्र ते काम केवळ दिखाव्यासाठी केले गेले होते.
यंदा पुन्हा हेच खड्डे उघडे पडले असून, यावेळी त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे.
MSRDC आणि कंत्राटदारांवर प्रश्नचिन्ह
या मार्गाची देखभाल ही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), मेहकर विभागाच्या अखत्यारीत आहे.
पण संबंधित अधिकाऱ्यांचा आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा आणि बेपर्वा दृष्टीकोन वारंवार समोर येत आहे.
फक्त कागदोपत्री काम पूर्ण दाखवून प्रत्यक्षात गुणवत्तेचा अभाव असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
वारकऱ्यांचा जीव धोक्यात, संतांच्या भक्तांचा रोष उफाळणार?
२५ जुलै (शुक्रवार) रोजी संत गजानन महाराजांची पालखी लोणारमध्ये दाखल होणार असून,
२६ जुलै (शनिवार) रोजी ती सुलतानपूरमार्गे मेहकरकडे मार्गस्थ होईल.
अशा परिस्थितीत वारकऱ्यांची प्रचंड संख्या या मार्गावरून प्रवास करणार असताना देखील प्रशासनाची ढिलाई सुटलेली नाही.
शेतीही संकटात; रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे नुकसान
निकृष्ट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यालगतच्या शेतांमध्ये शिरते, परिणामी दरवर्षी पीक हानीचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
प्रशासन ना भक्तांचे ऐकते, ना शेतकऱ्यांचे – अशी तीव्र भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
त्वरित रस्ते दुरुस्ती न झाल्यास जनक्षोभ उफाळण्याची शक्यता
शासन आणि MSRDC यांच्याकडून तत्काळ दुरुस्तीचे काम सुरु न केल्यास, संतांच्या भक्तांचा रोष उफाळून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही,
असा इशारा स्थानिक वारकरी संप्रदायांनी दिला आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा ढिसाळ कारभाराचा जाब जनतेसमोर द्यावा लागेल!
Read Also : https://ajinkyabharat.com/snakeshanshamue-19-year/