मुर्तिजापूरचा क्रीडा विश्वात अभिमानाचा क्षण
नेर (जि. यवतमाळ) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या अमरावती विभागस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, हातगाव (मुर्तिजापूर) येथील विद्यार्थ्यांनी लक्षणीय कामगिरी करत राज्यस्तरावर भक्कम प्रवेश मिळवला आहे. विविध वयोगटातील खेळाडूंनी केलेली उत्कृष्ट कामगिरी हा मुर्तिजापूर तालुक्यासाठी मोठा सन्मान मानला जात आहे.
१४ वर्षांच्या वयोगटात संविधान प्रदीप बरडे व ऋतुराज सतीश केवाडे या रिदमिक पेअरने प्रथम क्रमांक पटकावत विभागातील आपले वर्चस्व सिद्ध केले. १७ वर्षांच्या गटात विराट चक्रनारायण व विक्रम राणू चव्हाण या रिदमिक पेअरने उल्लेखनीय प्रदर्शन केले, तर मुलींच्या गटात श्रावस्ती रंगारी व खुशी कोलखेडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. आर्टिस्टिक योगा गटात प्रणव लोडम व कृष्णा कोल्हे (मुले) तसेच श्रुती गोपनारायण व वेदिका उगले (मुली) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
१९ वर्षांच्या गटात यश खंडारे व कृष्णा भोरे या आर्टिस्टिक पेअरने प्रभावी सादरीकरण करत पुढील फेरीत मजल मारली. तर मुलींच्या गटात पूर्वा रामटेके व सोनाक्षी जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे तनुश्री तायडे व अस्मीता गोपकर या रिदमिक पेअरनेही प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा मान उंचावला.
खेळाडूंच्या लवचिकता, संतुलन, कलात्मकता आणि सातत्यपूर्ण मेहनतीची ही कमाल असून विभागीय पातळीवर त्यांनी केलेली कामगिरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आशादायी ठरत आहे. त्यांच्या यशामुळे शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलसोबतच मुर्तिजापूरचा क्रीडा विश्वात झळाळता ठसा उमटला आहे.
शाळेचे प्राचार्य, क्रीडा प्रशिक्षक आणि शिक्षकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मुर्तिजापूरमधील तरुणाईसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरत असून योगासन क्रीडेला गावपातळीवरही मोठी गती मिळत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-smile-secrets-many-secrets-of-life-that-will-make-you-smile-know-them/
