“देशासाठी सर्वस्व गमावलं, पण सन्मानासाठी आजही संघर्ष सुरू आहे!”
विठ्ठल महल्ले, अकोला
अकोला :- शहरातील तारफैल लेबर कॉलनी येथील वीर जवान शेषराव श्रीराम म्हैसने हे मराठा लाईफ इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये कार्यरत
असताना 1965 साली पाकिस्तानसोबत चाललेल्या युद्धात 29 सप्टेंबर 1965 रोजी शत्रूंनी पेरून ठेवलेल्या सुरुंगाच्या स्फोटात शहीद झाले.
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाचा मृतदेहही आजतागायत सापडलेला नाही. वीज शहिदांच्या
कुटुंबीयांना शासनाने भरभरून दिले मात्र महानगरपालिकेने मालमत्ता कराची सवलत देण्यासाठी हात वर केले आहेत.
शौर्य आणि बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांवर हा एक प्रकारचा अन्याय म्हणावा लागेल.
शेषराव म्हैसने यांचा जन्म ३ डिसेंबर १९४० रोजी झाला. लहानपणापासूनच धाडसी आणि देशसेवेसाठी तत्पर असलेले शेषराव 1962 साली भारतीय लष्करात भरती झाले.
मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत असताना त्यांनी 1965 च्या युद्धात अपार धैर्य दाखवत सीमाभागात शत्रूशी तोंड देत प्राणार्पण केले.
शहीद शेषराव म्हैसने यांच्या कुटुंबाला शासनाने सन्मानाने मदत केली, पण स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सवलतीसाठी मात्र ते आजही लढा देत आहेत.
“देशासाठी जीव गमावला, आता प्रशासनाकडून सन्मानाची प्रतीक्षा.”
या यशोगाथेला पूर्णत्व मिळेल, जेव्हा स्थानिक प्रशासन या वीर परिवाराच्या हक्काचा सन्मान ओळखेल.हे एका वीरशहीदाच्या कुटुंबाची कहाणी आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्यांना केवळ युद्धभूमीवर नव्हे, तर त्यांच्या घरातही सन्मान मिळायला हवा.
….. वीरमाता कलावतीबाई म्हैसने यांची जबाबदारी
शेषराव हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या वीरमाता कलावतीबाई श्रीराम म्हैसने यांनी घराची जबाबदारी खांद्यावर घेतली.
त्यांचे दोन भाऊ – केशव आणि मोहन म्हैसने यांचे कुटुंब आजही एकत्र राहते.
….शासनाची मदत: जमीन व नोकरी
शहिदांच्या कुटुंबाला शासनाने 1970 मध्ये बाळापूर तालुक्यातील बारलिंग येथे 15 एकर 8 गुंठे जमीन, तसेच केशव म्हैसने यांना
एस.टी. महामंडळात नोकरी दिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर संजय म्हैसने यांना अनुकंपावर नोकरी देण्यात आली आणि ते आजही कर्तव्य बजावत आहेत.
— पण… अजून एक लढा सुरूच आहे
शासनाने भरभरून मदत केली असली तरी, आज महानगरपालिकेकडून मालमत्ता कर माफ करण्याची कायदेशीर सवलत या कुटुंबाला नाकारली जात आहे.
……. पात्रता असूनही करमाफी नाकारली
संजय म्हैसने यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्याकडून शहिदांच्या कुटुंबासाठी लागणारे पात्रता प्रमाणपत्र मिळवले.
मालमत्ता आजही वीरमाता कलावतीबाई म्हैसने यांच्या नावाने नोंदणीकृत असून, घराची हिस्सेवाटीही झालेली नाही.
पण तरीही अकोला महानगरपालिका वेगवेगळ्या दस्तावेजांची मागणी करत आहे, त्रुट्या काढत आहे आणि करमाफीसाठी टाळाटाळ करत आहे.
—कोट
> “शासनाने आम्हाला भरभरून दिलं. पण नियमांनुसार सवलत असूनही महापालिकेने करमाफी नाकारणं समजणं अशक्य आहे.
आमची मालमत्ता वीरमातेच्या नावाने असूनही टॅक्स मात्र त्यांच्या पतीच्या नावाने येतो. आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत, तरीही अडवणूक केली जात आहे.”
संजय म्हैसने
शहीद शेषराव म्हैसने यांचे नातू