निवडणूक काळात पावणेसात लाखांची अवैध दारू जप्त

अकोला, दि. 5 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 6 लक्ष 81 हजार 105 रू. चा अवैध मद्यसाठा व पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. आतापर्यंत एकूण 59 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधिक्षक सीमा झावरे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, निवडणूक नियमांचे पालन, तसेच शासनाच्या अंगीकृत महसूलाचे नुकसान व मद्यपींच्या आऱोग्याची हानी होऊ नये म्हणून अवैध मद्यविक्री, वाहतूक व निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘लिकर मॉनिटरिंग स्क्वाड’ची स्थापना करण्यात आली आहे.

आचारसंहितेच्या काळात पथकाकडून रात्रीची गस्त, वाहनांची तपासणी, अवैध धाब्यांची तपासणी, गुन्हे अन्वेषण आदी कार्यवाहीला वेग देण्यात आला आहे. ठोक, घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ठोक मद्यविक्री दुकानांच्या वाहनांवर जीपीएस बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ती वाहने जिथे मद्यपुरवठा करतात त्याचे ‘लोकेशन’ मिळते. त्यामुळे तपासणी व नोंदीसाठी मदत होते.

 किरकोळ मद्य दुकानांकडील दैनंदिन मद्यविक्रीचा तपशील तपासला जातो व वरिष्ठ विभाग, तसेच निवडणूक विभागाला कळवले जाते. जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीबाबत कोणालाही माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास 9623530244 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार कळवावी, असे आवाहन श्रीमती झावरे यांनी केले.