सात जन्मांच्या गाठीऐवजी लाखोंचा गंडा; बीडमध्ये फसवेगिरीचा थरार

लग्नाच्या आमिषाने केलेली लुटमार

लग्नाच्या आमिषाने तरुणाला पावणेदोन लाखांचा गंडा; नऊ जणांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

बीड  : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात लग्नाच्या आमिषाने तब्बल पावणेदोन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक

प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी वधू मिळण्यात अडचणी येत असल्याचा गैरफायदा घेत,

एका टोळीने लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. पोलिसांच्या दक्षतेमुळे ही संपूर्ण टोळी जेरबंद झाली आहे.

 कसे घडले प्रकरण?

पावरलूम वस्ती, वडवणी येथील ज्ञानेश्वर दत्तात्रय रोमन (वय 29) यांची ओळख दाजी गायकवाड यांच्या माध्यमातून महादेव जनार्धन घाटे यांच्याशी झाली.

घाटे व त्याच्या साथीदारांनी 10 ऑगस्ट रोजी राधा कैलास जाधव या नावाची मुलगी दाखवली.

त्यानंतर लग्नाची बोलणी होऊन तब्बल 1 लाख 70 हजारांमध्ये सौदा ठरला.

ज्ञानेश्वरने 1 लाख रुपये रोख व उर्वरित रक्कम फोन पे द्वारे दिली. पैशांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगदेखील करण्यात आले.

रात्री उशिरा ज्ञानेश्वरचे लग्न लावून देण्यात आले.

 वधूची खरी ओळख वेगळीच

18 ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने तिला परत बोलवण्यासाठी लोक पाठवल्याने तरुणाला संशय आला.

त्याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी कारवाई करून मुलगी व तिच्या साथीदारांना वडवणी पोलिस ठाण्यात आणले.

चौकशीत धक्कादायक बाब उघड झाली.

वधूचे खरे नाव राधा मुन्ना शर्मा असून ती जालना जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी महादेव घाटे, कैलास दळवी, जनार्धन थोरात, वनमाला शर्मा, राधा शर्मा, माधुरी फिरोज खान, सोमेश वाघमारे, प्रियांका बाफना आणि

एक अज्ञात महिला अशा नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात उघड झाले आहे की, ही टोळी वधू मिळण्यात अडचण असलेल्या तरुणांना टार्गेट करते, पैसे उकळते, लग्न लावून देते व काही

दिवसांनी वधूला परत नेते. अशा पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/bhar-pavasat-duchakivarun-shetat-descended-agriculture-minister/