कारंजा (लाड) – आर.जे.कॉन्व्हेंट शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी टाटा मॅजिक गाडी शुक्रवारी सकाळी मानोरा रोडवरील पाटील दूध संकलन केंद्राजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरून पलटी झाली. गाडीत एकूण १३ मुले होती. सुदैवाने कोणत्याही मुलाला दुखापत झाली नाही.गाडी पलटी झालेल्या जागी बाबुडीचे काटे व चिखल असल्याने प्रसंग गंभीर ठरू शकला असता. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी भारत तोडकर व मानव सेवा हेल्पलाइनचे सिकंदर खान यांनी चिखलात शिरून आणखी कुठले मूल गाडीखाली अडकले आहे का याची खात्री करून घेतली. कारण अपघाताच्या वेळी चिखलात सापही असल्याचे दिसून आले.अपघाताची माहिती मेस्को सुरक्षा रक्षक महेंद्र घुडे यांनी तातडीने श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे सेवक रमेश देशमुख यांना दिली. काही वेळातच सर्वधर्म संस्था अध्यक्ष शाम सवई, सासचे अजय ढोक, तर शिवनेरी रुग्णवाहिकाचे विनोद खोंड घटनास्थळी दाखल झाले. मुलांना वाचवल्यानंतर दुसऱ्या व्हॅनने त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.मुलं कारंजा येथील सहारा कॉलनी, गायकवाड नगर व भारत नगर परिसरातील असल्याचे समजते
पालकांना इशारा
या अपघातानंतर पालकांमध्ये चिंता वाढली आहे. अपघातात कुणी जखमी न झाल्याने ‘देव बळवंत’ असे म्हटले जात आहे. तरीही पालकांनी आपल्या मुलांच्या शालेय प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची स्थिती, क्षमता आणि फिटनेस तपासणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा एका छोट्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले जाते. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रशासनाने करावे लक्ष
या घटनेनंतर नागरिकांचे मत आहे की, सर्व शालेय वाहनांची फिटनेस तपासणी आणि कागदपत्रांची पाहणी तातडीने करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडणार नाहीत.
read also : https://ajinkyabharat.com/naira-chi-saas-in-real-life/
