अकोट (प्रतिनिधी):
सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे अकोट तालुक्यातील बोर्डी गावातील
घोगा नाल्याला मोठा पूर आला.
या पुराच्या प्रवाहात बोर्डी गावातील पक्क्या बांधणीचे सार्वजनिक शौचालय कोसळून पडले,
तसेच त्यावरील पाण्याची टाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.
गावात पाणी शिरण्याची शक्यता
घोगा नाल्याच्या काठावर संरक्षक भिंत नसल्याने गावात पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या भिंतीचे काम काही दिवसांपूर्वी मृद व जलसंधारण विभागाच्या ठेकेदारामार्फत सुरू झाले होते.
कामासाठी साहित्यही आणण्यात आले होते.
मात्र शेजारील शेतकऱ्यांनी अकोट न्यायालयात याविरोधात आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबविण्यात आले.
नुकसानीची पाहणी; प्रशासन सतर्क
या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन अकोटचे नायब तहसीलदार मनोज मानकर, मंडळ
अधिकारी पी. ए. होपळ, आणि तलाठी राजाभाऊ खामकर यांनी बोर्डी येथे भेट देऊन पाहणी केली आणि ठेकेदाराला सूचना दिल्या.
तसेच गावात दवंडी देऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया:
राजाभाऊ खामकर, तलाठी शिवपूर:
“काल बोर्डीतील घोगा नाल्याला आलेल्या पुरामुळे सरकारी शौचालय जमिनीवर
कोसळल्याची माहिती मिळताच आम्ही पाहणी केली आणि नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले.”
मनोज मानकर, नायब तहसीलदार, अकोट:
“शौचालय कोसळल्याची व टाकी वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही
तात्काळ पाहणी केली. तसेच ठेकेदार भूईभार यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.”
Read Also : https://ajinkyabharat.com/truck/