सासरकडून छळ आणि धमकी प्रकरण लग्नानंतर तरुणीची दुर्दैवी फसवणूक

पुण्यात लग्नानंतर

पुण्यात लग्नानंतर काही दिवसांतच एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मध्यवर्ती भागातील समर्थ पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणीने पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती जाणूनबुजून लपवून ठेवत लग्न लावल्याचा तसेच नंतर धमक्या, मानसिक छळ आणि बदनामी केल्याचा तिने आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.

काय आहे तक्रारदार तरुणीचा आरोप?

तक्रारीनुसार, पीडितेचा विवाह १८ एप्रिल २०२५ रोजी झाला. काही आठवड्यांतच तिला पतीमध्ये पुरुषत्व नसल्याची कल्पना आली. यानंतर तिने शांततेने हा मुद्दा पती व सासरच्या मंडळींसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षेप्रमाणे परिस्थिती हाताळण्याऐवजी तिच्यावरच उलट दबाव टाकण्यात आला, असे पीडितेने पोलिसांकडे नमूद केले.

तिने सांगितले की, “ही बाब घराबाहेर सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी तिला थेट धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर तिचेच एखाद्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप करून तिची बदनामी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. लग्नात पुरेसा मानपान केला नाही, अशा किरकोळ कारणांवरूनही तिला सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Related News

जाणीवपूर्वक लपवली महत्त्वाची माहिती?

पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत स्पष्टपणे म्हटले आहे की, पती नपुंसक असल्याची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना होती, तरीही त्यांनी ती गोष्ट इंतेनशपूर्वक लपवून ठेवली. फसवणूक करून लग्न लावण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणात पती, सासू, सासरे, नणंद, नणंदेचा पती आणि चुलत सासरा या सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांचा तपास सुरू

समर्थ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध फसवणूक, धमकी आणि मानसिक छळाचे गुन्हे नोंदवले आहेत. प्रकरणातील आरोप गंभीर असल्याने पुढील तपास गतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अशाच प्रकारची घटना येरवड्यातही

दरम्यान, मागील आठवड्यात येरवडा परिसरातही एक धक्कादायक घटना समोर आली होती. लग्नानंतर पती जवळीक साधत नसल्याची तक्रार पत्नीने केली. यावरून पती आणि सासरकडील मंडळींनी तिला सिगरेटचे चटके दिल्याचा प्रकार उघड झाला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

लग्नानंतर महिलांवरील छळाच्या घटना वाढत्या?

पुण्यात गेल्या काही महिन्यांत लग्नानंतर महिलांना छळ, धमक्या, मानसिक त्रास किंवा फसवणुकीच्या तक्रारींची संख्या वाढल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येते. पती किंवा सासरकडील मंडळींकडून महत्त्वाची माहिती लपवून लग्न करणे, त्यानंतर अत्याचार किंवा धमक्या देणे असे प्रकार चिंताजनक पातळीवर वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.

या घटनांमुळे विवाहापूर्वीच्या पडताळणीची, पारदर्शक संवादाची आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांची गरज अधोरेखित होत आहे. पुण्यातील दोन्ही ताज्या घटनांनी पुन्हा एकदा महिलांवरील छळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

Related News