मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी इराण- अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी म्हटले की, अमेरिकेने भारताच्या समुद्रहद्दीत येऊन इराणी जहाजावर हल्ला केला असून या हल्ल्यात 100 वर इराणी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला की, युद्धाच्या या गंभीर परिस्थितीत सरकारने कोणतीही योग्य भूमिका घेतलेली नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चेला देखील प्राधान्य दिले जात नाही.
संजय राऊत यांनी सांगितले की, “आजच्या परिस्थितीत सरकारची भूमिका काय आहे? सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा घडवायची नाहीये. ही जी भीती आहे ती राहुल गांधी यांची भीती आहे. कारण राहुल गांधी यांच्याकडून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, गुप्तचर तडजोरी याबाबत अत्यंत महत्वाची माहिती आहे. राहुल गांधी जे बोलतात, जे प्रश्न उपस्थित करतात, त्यावर भाजपाच्या सरकारकडे उत्तर देण्याची तयारी नसते.”
राऊतांनी पुढे आरोप केला की, युद्ध भारताच्या सीमेवर पोहोचले आहे. “अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीमध्ये येऊन इराणी जहाजावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक इराणी सैनिक मरण पावले आहेत. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्धाच्या दोन दिवस अगोदर इस्त्रायलला भेट देऊन आले, परंतु इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही,” राऊत म्हणाले.
Related News
राऊतांनी केंद्र सरकारच्या शांततेच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला: “मग तुम्ही शांततेच्या बाजूने कसे? जो इराण आपल्या वर्षानुवर्ष मित्र आहे, त्याचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही साधा शोकही व्यक्त करत नाहीत. ही तुमची कसली शांतता? ही षंड्यांची शांतता आहे. ऐरव्ही आमचे विश्वगुरू जगाला संदेश देत असतात, ते आज शांत आहेत. युद्धामागचे खरे कारण एपस्टीन फाईल आहे. एपस्टीन फाईलनंतर काही लोकांनी युद्ध पुकारले तर काही लोकांनी मौन राहणे पसंत केले.”
संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नरेश मस्के यांच्या संदर्भातील प्रश्नाला हसत-हसत दुर्लक्ष केले आणि म्हटले की, “कोण आहेत नरेंद्र मस्के? मी त्यांना ओळखत नाही.”
त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावरही भाष्य केले. राऊत म्हणाले की, “सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्या आहेत, त्या संबंधित कॅबिनेट सदस्य आहेत, त्यांनी या मुद्द्यावर बोलले पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस फक्त दादांच्या स्मारकाच्या गोष्टी करतात आणि रस्त्यांना नाव देण्यावर भर देतात. तर या विमान अपघातासारख्या गंभीर घटनांवर बोलणे किंवा अहवालाची वाट पाहणे ही जबाबदारी कुणाची आहे?”
संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत म्हटले की, “आपण जर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर कठोर निर्णय घेतला नाही, तर भारताच्या स्वाभिमानाला धोका आहे. युद्धाच्या वेळेस सरकारची भूमिका फक्त शांततेचा ढोंग करणे नसून, प्रत्यक्षात देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणे आणि आंतरराष्ट्रीय धोरण स्पष्ट करणे आवश्यक आहे.”
