‘सलमानने आम्हाला दिला होता कोरा चेक, लॉरेन्सच्या भावाचा दावा

मुंबई : अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

सलमानने बिश्नोई समाजाला मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचा दावा रमेश बिश्नोईने केला आहे. रमेश बिश्नोईने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, सलमानने आमच्या बिश्नोई समाजाला पैसे देऊ केले होते, परंतु आम्ही ते घेण्यास नकार दिला होता.

रमेश बिश्नोई म्हणाला, ‘सलमानचे वडील सलीम खान म्हणाले की, लॉरेन्स गँग पैशासाठी हे करत आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की त्याचा मुलगाच बिश्नोई समजासमोर चेकबुक घेऊन आलेला. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम या चेकवर टाका, असे त्याने सांगितले होते. तेव्हा आम्ही पैशासाठी भूकेले असतो तर लगेच गेलो असतो.

नेमकं काय आहे प्रकरण?

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात अटक आहे. तो अनेकदा सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देत असतो. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. हा संपूर्ण वाद १९९८ मध्ये झालेल्या काळवीटाच्या शिकारीशी संबंधित आहे. त्यानंतर यात सलमान खानचे नाव पुढे आले आणि त्याला अटकही झाली. मात्र, दोषी ठरल्यानंतर पुराव्याअभावी सलमानची जामिनावर सुटका करण्यात आली.