रोहित पवारांचा सवाल; ‘व्हिजीबिलीटी नसताना लँडिंगला परवानगी का?’

रोहित

Rohit Pawar : ‘त्यागी समितीचा नियम कुठे गेला?’ अजितदादांच्या विमान अपघातावर गंभीर सवाल

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत तपासातील त्रुटींवर थेट बोट ठेवले. “व्हिजीबिलीटी नसताना विमानाला टेक ऑफ आणि लँडिंगची परवानगी कशी देण्यात आली? 2009 मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टर अपघातानंतर नेमलेल्या त्यागी समितीने स्पष्ट नियम घालून दिले होते. मग ते नियम या प्रकरणात लागू का झाले नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘व्हिजीबिलीटी नसताना परवानगी कशी?’

रोहित पवार म्हणाले, “रिपोर्टनुसार विमान क्रमांक 4915 ने उड्डाण केले. मात्र हवामान प्रतिकूल असताना आणि दृश्यता कमी असताना बारामतीला जाण्याची परवानगी देण्यात आली. टेक ऑफला कसं परवानगी दिलं? एआयएबीने याकडे दुर्लक्ष केलं का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोन्ही पायलटांना बारामती विमानतळाची पूर्ण माहिती होती. रनवे क्रमांक 29 आणि 11 याबाबत ते जाणकार होते, तसेच ते यापूर्वी अनेकदा बारामतीत लँड झाले होते, असेही त्यांनी नमूद केले.

‘त्यागी समितीचे नियम पायदळी?’

2009 मध्ये वायएसआर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर त्यागी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात ‘व्हिजीबिलीटी नसताना, विशेषतः व्हीआयपी विमानप्रवासात, लँडिंग टाळावे’ असा स्पष्ट सल्ला देण्यात आला होता. रोहित पवार यांनी विचारले, “मग अजितदादांच्या बाबतीत हा नियम का पाळला गेला नाही? त्यागी समितीने केलेल्या शिफारसी केवळ कागदोपत्रीच राहिल्या का?”

‘विमान खराब होतं का?’

रोहित पवार यांनी तपास अहवालातील तांत्रिक बाबींवरही प्रश्न उपस्थित केले. “रिपोर्टनुसार या विमानाचे शेवटचे मेजर इन्स्पेक्शन 23 मार्च 2025 रोजी झाले होते. त्यानंतरही विमान उडवण्यात आले. याचा अर्थ विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम होते का? की काही बिघाड असूनही ते वापरले गेले?” असा संशय त्यांनी व्यक्त केला. “हे विमान मुद्दाम अजितदादांना देण्यात आले का?” असा सवाल करत त्यांनी निष्पक्ष तपासाची मागणी केली.

‘अॅरो ग्रुपवर गुन्हा दाखल करा’

रोहित पवार यांनी ‘अॅरो’ नावाच्या ग्रुपचा उल्लेख करत सांगितले की, या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशनचे सरकारी अधिकारी सहभागी होते. “अॅरो ग्रुपमधील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. एफआयआरमध्ये त्यांची नावे नमूद झाली पाहिजेत,” अशी मागणी त्यांनी केली.

जर्नी लॉग बुकमधील विसंगती

“जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनीकडून कसा गोंधळ घालण्यात आला आणि डीजीसीएने त्याला कसा सपोर्ट दिला, हे स्पष्ट होईल,” असा आरोप रोहित पवार यांनी केला. “हे विमान शमशाबादला जाणार होते. मात्र बारामती एटीसीला त्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. मेलद्वारेही कळवण्यात आले नव्हते. रिपोर्टमध्ये मात्र फक्त ‘बारामती टू बारामती’ असे उड्डाण दाखवले आहे,” असे ते म्हणाले.

तपास अधिकाऱ्यांची नावे कुठे?

रोहित पवार यांनी 2023 मधील एका विमान अपघात अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, त्या वेळी तपास अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती. “मात्र या प्रकरणात कोणत्याही तपास अधिकाऱ्याचे नाव दिलेले नाही. अजितदादांच्या बाबतीत भेदभाव का? अधिकाऱ्यांची नावे नसल्याचा अर्थ ते घाबरले आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

निष्पक्ष तपासाची मागणी

रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. “व्हिजीबिलीटी, तांत्रिक तपासणी, उड्डाण मार्ग, एटीसी संवाद, लॉग बुक नोंदी – या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषी कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात उभे राहिलेले प्रश्न आणि त्यावर रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे यामुळे राज्याच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. आता तपास यंत्रणा काय भूमिका घेते आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/4-minute-scene-from-the-kerala-story-2-goes-viral/