मुर्तिजापूरमध्ये रोहणा बॅरेज प्रकल्पाला गती; ७०७ कोटींच्या निधीतून शेतीसाठी कायमस्वरूपी उपाय

रोहणा बॅरेज प्रकल्प

मुर्तिजापूर प्रतिनिधी: मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटवण्यासाठी महत्त्वाकांक्षी रोहणा बॅरेज प्रकल्प आता युद्धपातळीवर सुरू झाला आहे. या प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर ७०७ कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून, कामाला वेग येण्याची अपेक्षा आहे.

रविवारी (दि. ११ जानेवारी) आमदार हरीश पिंपळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर सानप, तहसीलदार शिल्पा बोबडे आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आमदारांनी बॅरेजच्या तांत्रिक बाबींची माहिती घेतली आणि कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.

आमदार पिंपळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, प्रकल्पाचे काम केवळ जलद होणे आवश्यक नाही, तर त्याची गुणवत्ता टिकवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तितके काम पूर्ण करण्यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या प्रकल्पामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध होईल, भूजल पातळी वाढेल आणि परिसरातील शेतीचा कायापालट होईल, अशी अपेक्षा आहे. रोहणा बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी हा प्रकल्प मोठा टप्पा ठरणार आहे.

शेतकरी, अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा यामुळे शेतीसाठी या प्रकल्पाला अंतिम रूप देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. हरीश पिंपळे यांनी बळीराजाच्या हितासाठी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.

read also:  https://ajinkyabharat.com/murtijapur-2025-elections-held-bjps-vijay-prasthapatis-empire-destroyed-under-the-leadership-of-harish-pimple/