रिंकू राजगुरूचं मुंबईतलं जीवन

रिंकू राजगुरू

मुंबई: मराठी सिनेमा क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू अलिकडच्या काळात कामानिमित्त मुंबईत वास्तव्य करत आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही प्रभावी भूमिका साकारत झळकलेली रिंकू राजगुरू आता वेब सिरीज आणि नवीन सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अकलूज येथील मुळची रहिवासी असलेली रिंकूने मुंबईच्या जीवनशैलीवर आपल्या अनुभवाची मांडणी केली आहे.लोकमत फिल्मीशी बोलताना रिंकूने सांगितले, “मुंबईतलं आयुष्य छान आहे, वेगळं आहे. मी इथे कामासाठी आले, पण शेवटी मला ओढ गावाचीच आहे. माझं कुटुंब तिथेच आहे, त्यामुळे तिथे राहायला जास्त आवडतं.” तिने मुंबईत राहण्याचं एक कारण म्हणजे सोयीसुविधा आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी असल्याचंही स्पष्ट केलं.रिंकू पुढे म्हणाली, “मुंबई मस्त आहे! नवीन लोकांना मुंबई आपलंसं करून घेते, हे जे म्हणतात ते खरंच आहे.” मात्र, भटकंतीसाठी जास्त वेळ काढणारी ती नाही, “मी काम ते घर, काम ते घर एवढंच करते,” असं रिंकूने स्पष्ट केलं. तरीही, तिला सिद्धीविनायक मंदिरात जाऊन मन शांत करण्याची आवड असल्याचं सांगितलं.तिच्या कुटुंबाबाबत बोलताना रिंकूने सांगितले की, आई-बाबा शिक्षक असल्यामुळे वारंवार मुंबईला येणं शक्य होत नाही. त्यामुळे आईशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधणे, वाचन करणे आणि कधी कधी गावी जाऊन भेट देणं हे तिच्या जीवनातलं एक साधं पण समाधानदायी काम बनलं आहे.अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’, ‘झिम्मा 2’, ‘200 हल्ला हो’, ‘कागर’ यासह अनेक सिनेमांतून आपली प्रतिभा सिद्ध केली असून, नुकताच तिचा ‘बेटर हाफची लव्ह स्टोरी’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. लवकरच ती ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या सिनेमात प्रेक्षकांना भेटेल अशी अपेक्षा आहे.

read also : https://ajinkyabharat.com/jalna-district-moth-nete-shivajirao-chothe-nationalist-entry/