निकाल होणार राखीव!

सीबीएसई बोर्डाचा धडाकेबाज निर्णय

नवी दिल्ली :सीबीएसई (CBSE) बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. २०२५ च्या परीक्षांसाठी लागू होणाऱ्या या नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.बोर्डाच्या नव्या नियमानुसार, विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. जर एखादा विद्यार्थी शाळेत हजेरी न लावता थेट परीक्षेला बसण्यासाठी फॉर्म भरला, तर त्याला “अत्यावश्यक पुनरावृत्ती श्रेणी” (Essential Repeat Category) मध्ये टाकले जाईल. म्हणजेच त्या विद्यार्थ्याला निकाल न देता पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल.

उपस्थितीशिवाय निकाल होणार होल्ड

सीबीएसईने स्पष्ट केलं आहे की, आता अंतर्गत मूल्यांकन (Internal Assessment) ही बोर्ड परीक्षेचा महत्त्वाचा भाग असेल. विद्यार्थी शाळेत उपस्थित नसतील तर त्यांचे मूल्यांकन होणार नाही, परिणामी त्यांचा निकाल बोर्डाकडून राखून ठेवला जाईल.

विषय निवडीचे नवे नियम

दहावीच्या विद्यार्थ्यांना : ५ अनिवार्य विषय + २ अतिरिक्त विषय घेण्याची मुभा.

बारावीच्या विद्यार्थ्यांना : १ अतिरिक्त विषयाची परवानगी.

अतिरिक्त विषय हे मागील वर्गातील (९वी व ११वी) अभ्यासक्रमातूनच ठरवावे लागतील.

प्रायव्हेट विद्यार्थ्यांना सूट

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की प्रायव्हेट विद्यार्थी कोणत्याही शाळेशी संलग्न नसतानाही परीक्षा देऊ शकतात. मात्र, शाळांकडे जर प्रयोगशाळा किंवा सुविधा नसेल, तर त्या शाळांना अतिरिक्त विषय लागू करता येणार नाहीत.

विद्यार्थी व पालकांसाठी इशारा

बोर्डाच्या या निर्णयामुळे, विद्यार्थ्यांनी व पालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊन मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

सीबीएसई बोर्डाने उपस्थिती व अंतर्गत मूल्यांकनाला प्राधान्य देत मोठा नियम बदल केला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी जरी कठोर असला, तरी गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणारा ठरेल.

read also :https://ajinkyabharat.com/tya-divashi-tila-samor-baghanam-khup-hot-hot-hot/