मुंबई – “एकनाथ शिंदेंनी तुमच्या खांद्यावर बंदुक ठेऊन आंदोलन केलं.
उद्देश आरक्षण नव्हता, देवेंद्र फडणवीसांना घेरणं हा होता”
असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी केला होता.
या आरोपाला आज मनोज जरांगे पाटील यांनी थेट उत्तर दिलं आहे.
“शिंदे साहेब बिचारा माणूस, असं कधीच करु शकत नाही.
जर तसं खरंच असतं, तर मी स्वतः सांगितलं असतं आम्हाला आरक्षण नको,
फक्त फडणवीसांना घेरायचं आहे. पण तसं नाही. मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे,
मराठ्याचं पोरगं आहे.” असं जरांगे म्हणाले.
राऊतांच्या आरोपावर ते पुढे म्हणाले,
“माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन चालवण्याची कोणाची टाप नाही.
समाज माझ्या पाठिशी आहे, माझं काम रोखठोक आहे.
मी समाजाला दिलेलं वचन पाळलं आहे. मुंबईला जाणार म्हटलं आणि गेलो.
जीआर आणणार म्हटलं आणि आणला. मला राजकारण नकोय,
फक्त आरक्षण पाहिजे हे मी दोन वर्षांत सिद्ध केलं आहे.”
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देताना जरांगे पाटील म्हणाले,
“आम्हाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असं सांगितलं होतं.
मग त्या रागात जर खरंच काही करायचं असतं तर
फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतलं असतं.
पण आम्ही तसं केलं नाही. कारण आमचं लक्ष्य फक्त आरक्षण आहे.”
राऊतांनी ‘जरांगे समाधानी परतले म्हणजे वाटाघाटी यशस्वी’ असा दावा केला होता. यावर जरांगे म्हणाले –
“जीआर निघाला ना? मग आम्ही तिथे झोपून राहून दगंली करायच्या होत्या की काय?
हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर आणलेत, मग काम झालं.”
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले
आरक्षणाच्या आंदोलनामागे कोणतंही राजकीय डावपेच नाहीत.
संजय राऊतांचे आरोप निराधार आहेत.
