दहशतवादी कारवायांतील सहभागाची चौकशी सुरू

दहशतवादी

भिवंडीमध्ये यूपी एटीएसची मोठी कारवाई

भिवंडी : उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (यूपी एटीएस) शनिवारी उशिरापर्यंत भिवंडी शहरात धडक कारवाई करत तिघा तरुणांना अटक केली. या तिघांवर संशयास्पद दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असून त्यांनी गोळा केलेली तब्बल तीन लाख रुपयांची रक्कम फिलिस्तीनला पाठवली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी –

  • मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (22, सहारा अपार्टमेंट, भिवंडी)

  • अबू सुफियान तजम्मुल अन्सारी (22, गुलजार नगर, भिवंडी)

  • जैद नोटियार अब्दुल कादिर (22, वेताळ पाडा, भिवंडी)

यूपी एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्टच्या तपासादरम्यान भिवंडीतून उत्तर प्रदेशात आणि तेथून फिलिस्तीनकडे लाखोंची रक्कम जात असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर शुक्रवारी एटीएस पथक भिवंडीत दाखल झाले. शनिवारी गुलजार नगरमधील एका इमारतीत छापा टाकून अबू सुफियानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने उर्वरित दोन साथीदारांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांच्या मदतीने दोघांनाही शांतीनगर व निजामपूरा परिसरातून पकडण्यात आले.तिघांवर दहशतवाद्यांना अर्थसाहाय्य केल्याचा आरोप असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी त्यांना लखनौ एटीएस कार्यालयात नेण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

याआधीही ठाणे जिल्ह्यात अशाच घटना समोर

भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पोलीस यंत्रणेच्या छापेमारीदरम्यान पीएफआय संघटनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच पडघा गावच्या हद्दीतून इसिसशी संबंधित आठ ते दहा जणांना काही महिन्यांपूर्वी पकडण्यात आले होते. अलीकडेच अंबरनाथमधील नेवाळी नाका परिसरातून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी गजाआड केले होते.भिवंडी परिसरातून वारंवार अशा प्रकारचे संशयित दहशतवादी संबंध उघड होत असल्याने मुंबई व ठाणे जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/contractor-causes-anneter-notis-48-tasancha-ultimatum/