मुंबई :
विधीमंडळाच्या सभागृहात बसून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले असून, विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “जर कोकाटे यांनी प्रत्यक्षात रमी खेळली असेल, तर त्याचं समर्थन होऊ शकत नाही.
हे आरोप सिद्ध झाले, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल.”
मात्र त्यांनी व्हिडीओ बनवण्यात आणि तो व्हायरल करण्यात नियमभंग झाला का? यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
“नेमका हा व्हिडीओ अभ्यागत गॅलरीतून काढला गेला की पत्रकार गॅलरीतून? व्हिडीओ कुणी काढला आणि व्हायरल केला? याचा शोध घेतला पाहिजे.
मी कोकाटेंचं समर्थन करत नाही, पण नियमावलीचा भंग झाला असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे,” असं मिटकरी म्हणाले.
याच चर्चेच्या दरम्यान त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी याआधी अशा घटनांबाबत केलेल्या नियमावलीच्या आठवणीचाही संदर्भ दिला.
अमोल मिटकरी, आमदार – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
“मी माणिकराव कोकाटेंचं समर्थन करत नाही, पण व्हिडीओ कुठून आणि कशा प्रकारे व्हायरल झाला, याची चौकशीही तितकीच महत्त्वाची आहे.”