अकोला – रक्षाबंधनाच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये “नो कनेक्टीव्हीटी “ बोर्ड झळकू
लागल्याने नागरिक, विशेषतः महिला, नाराज झाल्या आहेत.
भावाला राखी पाठवण्यासाठी उत्सुक असलेल्या बहिणींना पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, रामदासपेठ, जुने शहर यांसह जवळपास सर्वच टपाल कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन स्थिती कायम आहे.
परिणामी, नागरिकांना वारंवार चकरा मारूनही काम होत नसल्याने नाराजी वाढली आहे.
पूर्वी तंत्रज्ञान नसतानाही राख्या वेळेत भावांपर्यंत पोहोचत असत, परंतु आता आधुनिक सुविधा असूनही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्या वेळेत पाठवणे अशक्य ठरत आहे.
अनेक महिलांनी यावर्षी भावाला राखी वेळेत न पोहोचल्याची खंत व्यक्त केली.
संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी “काही इलाज नाही” अशी प्रतिक्रिया दिल्याचे समजते.
त्यामुळे दूरवर असलेल्या अनेक भावांना यंदा राखीशिवायच रक्षाबंधन साजरे करावे लागणार आहे.