डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” निमित्ताने आयोजित बौद्धिक
चर्चासत्रात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी राज्याच्या विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा
भागातील शाश्वत शेती व शाश्वत विकासासाठी व्यावसायिक देशी गोवंश संवर्धन हे अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगितले.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी दुग्ध व्यवसायाला शेतीचा सक्षम जोडीदार म्हणत पशुधनाचे अर्थकारण,
उत्पादन क्षमता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील योगदान यावर भर दिला. देशी जनावरांच्या संरक्षणासोबतच
त्यांच्या प्रजनन क्षमतेत व उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालनाचे काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुग्धोत्पादनात भारत आघाडीवर, पण…
भारत जगातील सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश असला तरी प्रति जनावर उत्पादन सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे,
अशी वस्तुस्थिती गडाख यांनी मांडली. मात्र अल्प खर्चात, शेतीतील टाकाऊ अवशेषांचा उपयोग
करून गुणवत्तापूर्ण दूध आणि शेणखत निर्मिती करण्याची ताकद देशी गोवंशात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम:
राज्य शासनाने २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला
असून त्याअंतर्गत या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. साधना घुगे यांनी विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली.
त्यांनी जातिवंत जनावरांची खरेदी, वैरण विकास, दुग्ध पदार्थ उत्पादन व विपणन यासारख्या विविध योजनांचा ओहापोह केला.
देशी गोवंश संवर्धनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाचे नियोजन तसेच गोपालन
जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाच्या उपलब्धी आणि कामगिरी:
कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांनी देशी व उच्च उत्पादनक्षम गाईंच्या (साहिवाल, गीर, थारपारकर, काँक्रेज इ.)
संवर्धन प्रकल्पांची माहिती दिली. वैरण उत्पादन, मुरघास तंत्रज्ञान,
गोबर गॅस आणि दुग्ध प्रक्रिया यासंबंधीचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण उपक्रमही राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या शेतकरी व गोपालकांनी
प्रत्यक्ष विभागाला भेट देऊन प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती:
या चर्चासत्राचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.
प्रमुख उपस्थितीत डॉ. अरविंद सोनकांबळे, डॉ. ययाति तायडे, डॉ. शैलेश हरणे, जिल्हा उपायुक्त डॉ. साधना घुगे, तसेच विविध
विभागाचे प्रमुख व शास्त्रज्ञ, 40 पेक्षा अधिक गोपालक शेतकरी आणि विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
गोषाळा भेट आणि गोमाता पूजन:
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला विभागाच्या गोशाळेत साहिवाल गायींचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थ्यांसोबत प्रक्षेत्र फेरी घेण्यात आली.
सुत्रसंचालन व संयोजन:
प्रा. डॉ. राजेश्वर शेळके यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. संजीवकुमार नागे यांनी आभार प्रदर्शन केले.
विभागप्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. संजय शेगोकार,
डॉ. बिडवे, डॉ. कविता पाटील आदींनी आयोजनात मोलाचा वाटा उचलला.
Read Also : https://ajinkyabharat.com/rami-whideoveron-state-temperature-vadle/