महाराष्ट्रमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीला मोठं नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. राज्यातील अनेक भागात अजूनही अतिवृष्टीचा धोका कायम आहे. भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. शाळा आणि समाज मंदिरात नागरिकांची सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे.ठाणे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 21 जखमी आहेत. सर्वाधिक मृत्यू कल्याण तालुक्यात झाले आहेत. मुसळधार पावसामुळे ठाणे, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याणसह अनेक भागात सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. महामार्ग आणि शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून रेल्वे सेवांवरही परिणाम झाला आहे. रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत ठाण्यात 84.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात पावसाचं संकट

30
Sep