राहेर येथे ‘हर हर महादेव’च्या गजरात पहिली भव्य कावड यात्रा; १५० हून अधिक भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग
पातूर – श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर पातूर तालुक्यातील राहेर येथे यंदा पहिल्यांदाच ‘जय शिवशंभू’ कावड मंडळाच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले.
उटीजवळील देळप श्रीक्षेत्र सप्तऋषी संस्थान येथून पवित्र जल आणत ४० किलोमीटर पायी प्रवास करून १५० हून अधिक कावडधारी भक्तांनी गावातील महादेव मंदिरात जलाभिषेक केला.
शनिवारी संध्याकाळी कावड मंडळ देळप येथे दाखल झाले. रविवारी सकाळी पवित्र जल भरून कावड सजवण्यात आली.
निनावणी पावलांनी ‘हर हर महादेव’च्या गजरात कावडधारी पुढे निघाले.
मार्गात उटी, गोमेधर, वरवंड, बोथा फाटा, पारखेड फाटा, देऊळगाव साकर्शा, उमरा आदी ठिकाणी भाविकांसाठी सकाळ-संध्याकाळ जेवण, चहा, फराळ व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली.
राहेर येथे कावड पोहोचताच जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमले.
महादेव मंदिरात जलाभिषेक करून पूजा-अर्चा व आरती झाल्यानंतर डीजेच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले.
महिलांनी ठिकठिकाणी कावड यात्रेची पूजा-अारती केली. महाप्रसादाचा सर्व भक्तांनी लाभ घेतला.
यात्रेतील आकर्षण ठरलेली नंदीवर विराजमान महादेवाची मूर्ती आणि समोरील पिंड भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
कावड मिरवणुकीत नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, बाल दुर्गा मंडळ, शारदा उत्सव मंडळ, बाल गणेश मंडळ यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
उत्सव शांततेत व भक्तिभावात पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/three-mahamandanchaya-debt-yojneti-jambhedar-aty-relaxed/