त्वरित शिक्षक देण्याची मागणी

शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक, त्वरित शिक्षक देण्याची मागणी

तेल्हारा : पंचायत समिती तेल्हारा केंद्र अडसूळ अंतर्गत येणाऱ्या नेर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या तातडीने भरतीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शासन आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्ग असलेल्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्याने आता फक्त दोन शिक्षक शाळेत रुजू झाले आहेत.शाळेची सध्याची विद्यार्थी संख्या ९५ असून, केवळ दोन शिक्षकांनी शाळा सांभाळणे अशक्य असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी गटशिक्षणाधिकारी सुनीता  तळोकार यांना लेखी निवेदन दिले आहे.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल  तायडे, उपाध्यक्ष कबीर मिया देशमुख, तसेच अनेक सदस्य – सुनील  तायडे, भगवंत बावणे, प्रमोद पारधी, उमेश मोकळकर, बंडू तायडे, अनंता मोहोळ, सागर कापसे इत्यादी उपस्थित होते. त्यांनी निवेदनात तात्काळ दोन शिक्षक शाळेवर नेण्याची मागणी केली असून, अन्यथा शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

शाळा व्यवस्थापन समिती व पालक वर्गाच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे,

“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने संबंधित विभागाच्या दखलीने आवश्यक तेवढे शिक्षक लवकरात लवकर नेर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत नियुक्त करावे. अन्यथा शाळा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर बंद करून गंभीर आंदोलनाची तयारी आम्ही करू.”

सदर परिस्थितीवर संबंधित विभागाने तत्परतेने निर्णय घेऊन शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/mohan-gandhi-yancha-prosperous-teacher-awards-state-level-gaurav/