पुणे – शेतकरी प्रश्नांवर आवाज उठवणारे माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून
पुण्यात हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
फुरसुंगी येथील द्वारकाधीश गोशाळेजवळ त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
सांगलीतील शेतकऱ्यांच्या दहा म्हशी गोरक्षकांनी जबरदस्तीने नेल्या होत्या.
त्या परत आणण्यासाठी सदाभाऊ खोत कार्यकर्त्यांसह पुण्यातील गोशाळेत गेले होते.
मात्र, गोशाळेत म्हशी असल्याचा पत्ता न लागल्याने त्यांनी चौकशी केली असता गोरक्षकांनी त्यांच्याशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर अचानक गोरक्षक आक्रमक झाले आणि खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली.
नेमकं काय प्रकरण?
दोन महिन्यांपूर्वी सांगलीतील शेतकऱ्यांना मारहाण करून त्यांच्या म्हशी फुरसुंगीच्या गोशाळेत आणण्यात आल्या होत्या.
न्यायालयाने त्या जनावरांना शेतकऱ्यांकडे परत देण्याचा आदेश दिला होता.
मात्र, शेतकरी म्हशी घेण्यासाठी गेले असता त्या गोशाळेत सापडल्या नाहीत. चौकशीत गोरक्षकांनी “म्हशी
चरायला डोंगरावर सोडल्या होत्या, त्या निघून गेल्या” असे उडवाउडवीचे उत्तर दिले.
सदाभाऊ खोत यांचा संताप
या प्रकरणी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले,
“गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकऱ्यांना त्रास दिला जातो.
त्यांची जनावरे बळजबरीने गोशाळेत नेली जातात आणि दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले
जातात. निकाल लागेपर्यंत शेतकरी दंड भरू शकत नाही, त्यामुळे जनावरे परत मिळत नाहीत.
हे शेतकऱ्यांवरील अन्याय आहे.”
यावर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खोत यांनी केली.
तसेच, “जर कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनसमोर जनावरांच्या छावण्या उभारू,” असा इशाराही त्यांनी दिला.
या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून, गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/environmental-chawitun-lal-mati-ganeshmurti-manufactured-2/