समृद्धी महामार्गावर भीषण ट्रक अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण ट्रक अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

कारंजा (प्रतिनिधी)

समृद्धी महामार्गावर ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रामदास सुभाष साळवे (वय ३२, रा. दर्याबाई पाडळी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, MH40 BF 5725 क्रमांकाचा ट्रक नागपूर कॅरिडॉरवरील पोहा गावाजवळील चायनल नंबर १८८ या ठिकाणी आला असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे रामदास साळवे ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडला व गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तत्काळ गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी समृद्धी महामार्गावरील १०८ लोकेशन सेवा आणि कारंजा येथील वैद्यकीय पथकाला माहिती दिली. पायलट आतिश चव्हाण व डॉ. भास्कर राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेला मृतदेह जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

या अपघाताची नोंद कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दल, महामार्गावरील सुरक्षा रक्षक आणि हायवे पोलीस तत्काळ दाखल होऊन मदतकार्यात सहभागी झाले.

या दुर्घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.