नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) प्रसारित झालेल्या
‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांशी
संवाद साधत स्वदेशीचा मंत्र दिला. ‘मन की बात’ चा हा १२५ वा भाग होता.
यामध्ये पंतप्रधानांनी ‘व्होकल फॉर लोकल’चा पुन्हा
एकदा उल्लेख करत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले.
व्होकल फॉर लोकलवर भर
गणेशोत्सव सुरू असून आगामी दिवसांत विविध सण-उत्सव साजरे होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “या सणांमध्ये स्वदेशीला विसरू नका.
आपण एकमेकांना देणाऱ्या भेटवस्तू भारतात तयार झालेल्या असल्या पाहिजेत.
कपडे, सजावट, दिवे – हे सर्व देशात बनलेले असावे.
आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट स्वदेशी असली पाहिजे.
गर्वाने म्हणा की हे स्वदेशी आहे.”
ते पुढे म्हणाले, “व्होकल फॉर लोकल,
आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा मार्ग आहे.
आपले ध्येय ‘विकसित भारत’ हेच आहे आणि ते स्वदेशीच्या बळावरच साध्य होणार आहे.”
नैसर्गिक आपत्तींबाबत भाष्य
उत्तर भारतातील मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे,
जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले,
“या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती देशाची परीक्षा घेत आहे.
अशा परिस्थितीत एनडीआरएफ,
एसडीआरएफ आणि स्थानिक संस्था तत्परतेने काम करत आहेत.”
जम्मू-काश्मीरचा उल्लेख
कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचा विशेष उल्लेख करण्यात आला.
पुलवामा येथील स्टेडियममध्ये पहिल्यांदाच झालेला
डे-नाईट क्रिकेट सामना पाहून आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
“पूर्वी हे अशक्य वाटायचे; मात्र आता देश बदलत आहे.
पुलवामातील लोकांना डे-नाईट क्रिकेटचा आनंद घेताना
पाहणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे,” असे ते म्हणाले.
Read also : https://ajinkyabharat.com/palpada-yehe-suayog-deshmukh-mitra-family-turfe-mofat-arogya-shibir/