प्रवाशांनो, लक्ष द्या!

मोनोरेल स्थगितीनंतर पुन्हा कधी सुरू होणार?

देशातील एकमेव मोनोरेल सेवा तात्पुरती बंद – २० सप्टेंबरपासून अमलात, पुन्हा कधी सुरू होणार?

मुंबई :देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल सेवा २० सप्टेंबरपासून तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. २४६० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेली ही सेवा चेंबूर ते सातरस्ता या मार्गावर सुरू असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

का थांबवली मोनोरेल सेवा?

सध्या दररोज सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० या वेळेत मोनोरेल धावत असते. पण इतक्या कमी कालावधीत तांत्रिक सुधारणा आणि दुरुस्ती करणे अशक्य असल्याने अखंडित वेळ आवश्यक आहे. सुरक्षाविषयक कामे, पॉवर रेल बंद-डिस्चार्ज-रिचार्ज करणे, तसेच नवे रेक्स आणि आधुनिक सिग्नलिंग सिस्टीम बसवण्यासाठीच ही सेवा थांबवली जात आहे.

कोणते बदल होणार?

नवीन CBTC (Communication-Based Train Control) प्रणालीचा समावेश

५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग – ३२ ठिकाणी चाचणी सुरू

२६० Wi-Fi ॲक्सेस पॉइंट्स, ५०० RFID टॅग्स, ९० ट्रेन डिटेक्शन युनिट्स बसवले

वे साइड सिग्नलिंगचे काम पूर्ण, एकात्मिक चाचणी सुरू

८ नवे रेक्स मुंबईत पोहोचले, ९ वा रेक चाचणीसाठी सज्ज, १० वा रेक तयार होत आहे

प्रवाशांची प्रतीक्षा वाढणार

मोनोरेलमध्ये एका गाडीत ५६२ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. मात्र, नादुरुस्त रेक्स आणि वारंवार अपघातांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता ही सेवा किती दिवस बंद राहील, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली तरी तांत्रिक कामांना किमान काही महिने लागू शकतात, असे संकेत मिळत आहेत.

read also :https://ajinkyabharat.com/history-amended-lamp/