पातूर:दि. २६ सप्टेंबर २०२५ जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व असलेलं गाव म्हणजे पातूर. या गावाचं विशेष ओळखपत्र म्हणजे ग्रामदैवत रेणुका मातेचं मंदिर. डोंगरावर वसलेलं हे देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. “नवसाला पावणारी रेणुकामाता” म्हणून प्रसिद्ध असलेली ही माता संपूर्ण विदर्भातील भक्तांसाठी श्रद्धास्थान ठरली आहे. या मंदिराचा आणि परिसराचा झपाट्याने विकास विश्वस्त मंडळाच्या कल्पकतेतून सुरू आहे. विशेषतः नवरात्र उत्सव, तसेच वर्षभर प्रत्येक मंगळवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी :पातूर हे गाव ‘नानासाहेबांचे पातूर’ म्हणूनही ओळखले जाते. नानासाहेब पेशव्यांशी या गावाचा ऐतिहासिक संबंध आहे. रेणुका मातेच्या मंदिरासमोर असलेल्या डोंगरावर प्राचीन लेण्या, भुयारं, तसेच पूर्वीचा किल्ला आणि तटबंदी अजूनही पातूरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.
रेणुका माता – माहूर मातेचं प्रतिरूप : पातूरची रेणुका माता ही माहूरच्या रेणुकेचं प्रतिरूप मानली जाते. त्यामुळे पातूर हे विदर्भातील भक्तांसाठी जणू ‘प्रती माहूर’ ठरतं. देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या चिंचोली रुद्रायनी देवीचं मंदिर येथे डोंगरावरून सहज दिसतं.
मंदिराची निर्मिती आणि विकास : सुमारे ६५ वर्षांपूर्वी या ठिकाणी मूळ मूर्ती विराजमान होती. पूर्वी हे ठिकाण जंगलमय असल्याने फारसे भाविक येत नसत. परंतु तात्यासाहेब अत्तरकर यांच्या प्रयत्नातून मंदिर बांधणीस सुरुवात झाली. आज येथे
रेणुका मातेचे मुख्य मंदिर
श्रीकृष्ण मंदिर
राम-सीता-लक्ष्मण मंदिर
अनुसया माता व दत्तात्रय मंदिर
अशी अनेक मंदिरे आहेत.आज मंदिराकडे जाण्यासाठी २५६ पक्क्या पायऱ्या, पाण्याची सुविधा, भक्तनिवास, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, तसेच सुंदर सुविचारांनी नटलेला डोंगर परिसर उपलब्ध आहे.डोंगर चढताना संकटमोचन गणपतीचे मंदिर, तसेच आयुष्य मंदिर सेवेकरिता अर्पण केलेल्या दीनानाथ महाराजांची समाधी भाविकांना दर्शन देते.
निसर्गरम्य वातावरण :मंदिराजवळून वाहणारी बोर्डी नदी, तसेच खाली दिसणारा नानासाहेबांचा वाडा हे दृश्य भाविकांना मंत्रमुग्ध करतं.
भाविकांची श्रद्धा :नवरात्रीत देवी स्वतः मंदिरात वास करते, अशी श्रद्धा असल्याने या काळात भाविकांची प्रचंड गर्दी असते. दर मंगळवारीही मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.
read also:https://ajinkyabharat.com/boxing-competition-strong-fame/
