गरीब पक्षकारांना न्याय मिळाला तरच न्यायालयाचा उद्देश सार्थ – न्यायमूर्ती किलोर

वकिली म्हणजे समाजसेवा – न्यायमूर्ती किलोर यांचे स्पष्ट मत

कारंजा (लाड) : “गरीब पक्षकारांना न्याय मिळाला तरच न्यायालयाचा उद्देश सार्थ ठरेल”, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

अनिल सत्यविजय किलोर यांनी केले.येथील स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत नवीन दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय

कार्यान्वित झाले असून, त्याचा उद्घाटन सोहळा २४ ऑगस्ट रोजी पार पडला. उद्घाटक म्हणून बोलताना न्यायमूर्ती किलोर यांनी वकिली ही समाजसेवा

असल्याचे नमूद करत, “वकिलांनी केवळ पैशाकडे लक्ष दिले तर गोरगरिबांना न्याय कोण देणार? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर

गोरगरीब पक्षकारांना न्याय मिळणे आवश्यक आहे” असे मत व्यक्त केले.

या वेळी अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, मुख्य अतिथी म्हणून न्यायमूर्ती अभय मंत्री (उच्च न्यायालय मुंबई), प्रमुख पाहुणे

आमदार सईताई डहाके, न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर, भारतीय विधीज्ञ परिषदेचे सदस्य ॲड. आशिष देशमुख, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे पहिले

न्यायाधीश सचिन ठोंबरे, तसेच विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. अविनाश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

या न्यायालयामुळे कारंजा व परिसरातील न्यायदान प्रक्रिया अधिक सुकर, सुलभ व जलद होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक

जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. सुमंत बंडाळे व ॲड. रवींद्र रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन न्यायाधीश सचिन

ठोंबरे यांनी केले.या सोहळ्यास न्यायिक क्षेत्रातील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also :https://ajinkyabharat.com/khasi-basala-aapar-11-pravasi-jakhmi/