सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पाटीलांच्या मते, सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंब गंभीर संकटात आहेत, तर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिक तयारी ही परिस्थिती पाहता नाही.
जयंत पाटील म्हणाले की, “विद्यार्थी आपल्या आई–बापांचे होणारे हाल पाहून, शेवारात पसरलेल्या पाण्याचे व्हिडिओ बघून हवालदिल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत परीक्षा देणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे आयोगाने विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलावी.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी
जयंत पाटील यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त शेतांची पाहणी केली आणि त्या भागातील शेतकरी, लोकांच्या हालचालींचे निरीक्षण केले. त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची मागणी केली. त्याचबरोबर रस्त्यांच्या चुकीच्या बांधकामामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पाटील म्हणाले की, “सध्याचे रस्ते सिमेंटचे असून, त्यामध्ये पाणी मुरत नाही. १०० पेक्षा जास्त ठिकाणी रस्त्यांची रचना चुकीच्या पद्धतीने झाली आहे, त्यामुळे पाणी योग्य दिशेने जाण्यास नाकारणारे रस्ते निर्माण झाले आहेत. त्यामुळेच पूराचा फटका जास्त बसतो.”
शासनाला सबुरीचा सल्ला
पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे आणि त्यांच्या तोंडून आलेले कोणतेही चुकीचे विधान सत्ताधारी मंत्री किंवा मुख्यमंत्री समजून घेण्याचे सल्लेही दिले. त्यांनी हे सबुरीचे सल्ले अजित पवारांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या समान संधीसाठी मागणी
जयंत पाटील यांनी म्हटले की, नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, तर ही अत्यंत अन्यायकारक ठरेल. परीक्षेत समान संधी मिळावी ही प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा आहे. तयारी असूनही अशा बिकट परिस्थितीत बसून परीक्षा देणे म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. त्यामुळे आयोगाने बळजबरी न करता परीक्षा पुढे ढकलावी, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे.हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यातील अनेक गावे, शहरं पाण्याखाली असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अत्यंत कठीण आहे.
read also : https://ajinkyabharat.com/72-year-old-mahilela-lootanara-gajaad/
