डॉक्टर दाम्पत्याचा 70 लाखांचा चुना

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

ठाणे: ठाण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने कल्याणमधल्या दुसऱ्या डॉक्टरला तब्बल 70 लाख रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळील आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन देऊन डॉ. प्रसाद आणि पत्नी वैशाली साळी यांनी डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळेकडून 70 लाख रुपये चेकद्वारे घेतले.

दाम्पत्याने तीन महिन्यांत हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू झाले नाही आणि पैसे परत केले गेले नाहीत. या प्रकरणी प्रज्ञा कांबळे आणि डॉ. दुबे यांनी लेखी तक्रार आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत.

पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी अद्याप फरार आहेत. फसवणुकीत अजून काही डॉक्टर, फार्मासिस्ट आणि पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

डॉ. दुबे म्हणाले,

“डॉक्टर दाम्पत्याने हॉस्पिटल सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं, आमच्याकडे 70 लाख रुपये मागितले. चौदा महिने उलटले तरी पैसे परत मिळाले नाहीत आणि हॉस्पिटल सुरूही झालं नाही.”

पोलिसांना या प्रकरणात दाम्पत्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्टकडून केली जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/gavat-shokaka-pasli/