पातुर- आलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील गोळेगाव येथे पिण्याच्या पाण्याचा तीव्र संकट ओढावले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून गावातील महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून “हर घर नल, हर घर जल”
ही योजना पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र समोर आले आहे.गावात एकमेव शासकीय विहीर होती. मात्र अतिवृष्टी व गावातील सांडपाणी यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले आहे.
त्यामुळे महिला व मजुरवर्गाला मजुरीचे काम सोडून पाण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे.
विहिरीत जमा झालेल्या दूषित पाण्याचा उपसा प्रशासनाने तातडीने करणे आवश्यक होते, मात्र स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी पोळा सणानिमित्त गावकऱ्यांना स्वखर्चाने पाणीपुरवठा केला. तरीही समस्या न सुटल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.
गावकरी सांगतात की, निवडून आलेल्या सरपंचांना चार वर्षांचा कालावधी उलटला, परंतु गोळेगावात ते फिरकलेदेखील नाहीत.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पाण्याची समस्या तातडीने सोडवली नाही, तर आलेगावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढतील,
असा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी दिला आहे.