फिलीपिन्समध्ये मंगळवारी दुपारी 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपाने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. जुन्या बांधकामांच्या अनेक इमारती कोसळल्या असून अनेक नागरिक बेपत्ता आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकं युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वीजपुरवठा आणि कम्युनिकेशन सेवा खंडित झाल्याने मदत कार्यात अडचणी येत आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून वैद्यकीय सेवा सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. ‘रिंग ऑफ फायर’मुळे कायम भूकंपाचा धोका फिलीपिन्स हा देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात मोडतो. त्यामुळे इथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी स्फोट होतात. याआधीही 2013 मध्ये बोहोल येथे 7.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता ज्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.सध्या संपूर्ण देशात आकस्मिक मदत यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार राष्ट्रीय आपत्कालीन योजना राबवली जात आहे.
read also:https://ajinkyabharat.com/man-pours-petrol-over-himself-in-front/