ICC Warning to Suryakumar Yadav : सूर्यानं काय बोललं ?
नवी दिल्ली : आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आयसीसीकडे या वक्तव्याची तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी आयसीसीकडून सुनावणी पूर्ण झाली असून सूर्यकुमार यादवला अधिकृतपणे वॉर्निंग देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही.
सूर्यकुमार यादवचं वक्तव्य नेमकं काय?
14 सप्टेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात विजय मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादव पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला हजर झाला होता. त्यावेळी त्याने पहलागाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहत हा विजय भारतीय जवानांना समर्पित केला होता. “हा विजय आपल्या शूरवीर सैन्यदलाला अर्पण करतो. ते आम्हाला सतत प्रेरणा देतात,” असं सूर्यानं स्पष्ट केलं होतं.
PCBची तक्रार आणि ICCची कारवाई
सूर्याचं वक्तव्य राजकारणातून प्रेरित असून खेळाच्या प्रतिमेला धक्का देणारं आहे, असा आरोप PCBनं केला होता. या प्रकरणी माजी क्रिकेटपटू व मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी सुनावणी घेतली. आयसीसीनं सूर्याला अधिकृत वॉर्निंग देत त्याच्यावर दंडात्मक कारवाईची शक्यता वर्तवली आहे. त्याच्याकडून मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड स्वरूपात वसूल होऊ शकते, तसेच डिमेरिट पॉईंटही कपात होऊ शकतो.
डिमेरिट पॉईंट म्हणजे काय?
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार लेवल-1 चा गुन्हा ठरल्यास खेळाडूला डिमेरिट पॉईंट मिळतो. एका पॉईंटमुळे बंदी लागू होत नाही, मात्र 4 ते 7 डिमेरिट पॉईंट्स झाल्यास खेळाडूला पुढील सामन्यांतून निलंबन भोगावं लागतं.
पुढचं काय?
सूर्यकुमार यादवविरोधातील अंतिम निर्णय आयसीसी लवकरच जाहीर करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयनंही पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान आणि हॅरिस राऊफ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्या प्रकरणी सुनावणी उद्या होणार आहे.
आता क्रिकेट विश्वाचं लक्ष आयसीसीच्या अंतिम निर्णयाकडे लागलं आहे. सूर्या फक्त वॉर्निंगवर सुटणार की दंडाची कारवाई होणार ?
read also : https://ajinkyabharat.com/pak-vs-ban-bangladesh-sasamor-136-dhavanam-awahan-pakistan-rokhnar/
