पातूरातील काशी कवळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साज
शिवभक्तांना सात ते आठ क्विंटल साबुदाणा उसळीचा महाप्रसाद वितरित
लोकवर्गणीला आळा – सेवेचे व्रत पाळण्याचा अनोखा उपक्रम
Related News
पातूर (प्रतिनिधी) – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पातूर येथील श्री काशी कवळेश्वर महादेव
मंदिरात महाशिवरात्री महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. काशी कवळेश्वर
भजन मंडळ तसेच समस्त शिवभक्त मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी सहभागी होत महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
आज दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री निमित्त पहाटे ब्रह्म मुहूर्तावर रुद्राभिषेक करण्यात आला.
सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती. उपवासाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांना
साबुदाण्याच्या उसळीचा महाप्रसाद वाटण्यात आला. तब्बल सात ते आठ क्विंटल उसळीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
हर हर महादेवच्या गजरात खंजेरी भजनाचा खडखडाट
भक्तीभावाने भारलेल्या वातावरणात अखंड हरिनाम स्मरण आणि खंजेरी भजनाच्या सुरावटीने मंदिर परिसर
भक्तिरसात न्हाऊन निघाला. अनेक शिवभक्तांनी दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात सहभागी होत महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले.
पुरातन मंदिर व ऐतिहासिक परंपरा
श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिर पातूर शहराच्या दक्षिणेला सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर चिचखेड
शिवारात घनदाट वनराईत वसलेले आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामींच्या चरणांकित पादुका असून, महानुभाव
पंथीयांचे हे पवित्र आराध्य स्थळ आहे. या स्थळाला शासनाने ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.
४० वर्षांपासून येथे दर सोमवारी अखंड हरिनाम स्मरण आणि पंचपदी आरती सुरू असून, दत्तात्रय गिरोलकर,
प्रल्हाद यादव, रामभाऊ ढगे, प्रकाश तायडे, शामराव गिऱ्हे, लक्ष्मण गुजर, सुरेश कोथळकर, पंजाबराव सुरवाडे,
बळीराम सातव, बंडू पाटील, गजानन सातव, रामराव माहुलीकर, जयवंत पुरुषोत्तम आदींनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.
लोकवर्गणीला आळा – भक्तांकडून सेवा उपक्रम
या उत्सवात पैशाच्या स्वरूपात वर्गणी न घेता शिवभक्तांकडून साबुदाणा, शेंगदाणे, खाद्यतेल व इतर साहित्य स्वीकारण्यात आले.
स्व. प्रल्हाद यादव यांनी आजीवन गावरान गूळ चहा प्रसाद रूपाने वाटण्याची सेवा सुरू केली होती,
जी आता त्यांचे चिरंजीव संजय यादव व किशोर यादव पुढे नेत आहेत.
युवावर्गाचा सक्रिय सहभाग
यंदाच्या महाशिवरात्री महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पातूर शहरातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.
काशी कवळेश्वर भजन मंडळाच्या भक्तांनी खंजेरी भजनाच्या मधुर सुरावटींनी शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.
शिवभक्तांनी पुढील वर्षीही या उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा,
असे आवाहन काशी कवळेश्वर भजन मंडळ आणि समस्त शिवभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले.
हर हर महादेव!
Read more news here :https://ajinkyabharat.com/soybean-rate-ghasranine-shetkari-crisis-hamibhavaksha-thousands-of-thousands-of-deficiency-rates/