पातुर वनपरिक्षेत्रात गुप्त सापळा…

चंदनतस्करांना रंगेहात अटक !

पातुर : राखीव वनक्षेत्रातील चंदनतोडीवर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. पातुर वनपरिक्षेत्रातील चिचखेड भागातील कक्ष क्रमांक ६९ मध्ये दोन आरोपींना अवैध चंदनतोड करताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.अटक करण्यात आलेले आरोपी शेख अफसर शेख शरीफ (वय ६५) आणि सय्यद अली सय्यद चांद (दोघे रा. मुजावरपुरा, पातुर) अशी त्यांची नावे आहेत. वनकर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने चिचखेड परिसरात गस्त घातली असता आरोपींना कुर्हाडीच्या साहाय्याने चंदनतोड करताना पाहिले. चाहूल लागताच आरोपींनी मुद्देमाल आणि हत्यारे टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनपथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.त्यांच्याकडून एकूण ५.३७० किलो चंदन (९६६ ग्रॅम गाभा व ४४०४ ग्रॅम सालासह) जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध वन अधिनियम १९२७ अंतर्गत कलम २६ (१ अ) व २६ (१ फ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.या कारवाईत वनपाल जे. आर. माळोदे व वनरक्षक बी. व्ही. थोरात यांनी सहभाग घेतला. पुढील तपास वनपाल माळोदे करीत आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले, तसेच पातुर वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

read also : https://ajinkyabharat.com/bhumiputra-shetkari-sangatnecha-risod-tehsil-morcha/