पातूर-नंदापूरात अतिवृष्टी; दोन घरे कोसळली

पातूर-नंदापूरात अतिवृष्टी; दोन घरे कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली

पातूर-नंदापूर (प्रतिनिधी : विकास ठाकरे)
दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पातूर-नंदापूर परिसरात अचानक झालेल्या मुसळधार ढगफुटीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तर दोन कुटुंबांची घरे पूर्णपणे कोसळली.

घरांची पडझड, पण जीवितहानी टळली

पठाणपुरा येथील ताहेर खा सत्तार खा पठाण आणि रफिका बी शेख अयनु या दोघांच्या घरांची पडझड झाली. एकाचवेळी दोन्ही घरे कोसळल्याने मोठा आवाज झाला. मलमा मुख्य रस्त्यावर पडल्यामुळे गावकऱ्यांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.

गरीब कुटुंबावर संकट

रफिका बी शेख अयनु या विधवा असून त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता. परंतु अतिवृष्टीमुळे त्यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. ताहेर खा यांचेही संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले असून आता त्यांच्या राहण्याची सोयही उरलेली नाही.

पंचनामा व मदतीची मागणी

या घटनेनंतर गावकऱ्यांनी मागणी केली आहे की, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांनी तातडीने पंचनामा करून पीडितांना शासनाकडून मदत द्यावी.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/mundgavat-dar-ravivari-addiction/