बाळापूर (अकोला) : बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे 6100 क्यूसेक्सने उघडण्यात आले आहेत.
पातूर तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसामुळे मन नदीत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
परिणामी, पाणी साचल्याने बॅरेजवरील ताण वाढला आणि रात्री उशिरा हे दरवाजे उघडण्यात आले.
काल पारस परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला होता, ज्यामुळे शेती, घरांचे छप्पर,
जनावरांचे गोठे यांचे मोठे नुकसान झाले. त्याचाच फटका आजही जाणवत असून,
रात्री झालेल्या पावसामुळे बॅरेजवर मोठा पाण्याचा विसर्ग नोंदवण्यात आला आहे.
बॅरेजचे दरवाजे उघडल्यामुळे बाळापूर शहराला जोडणाऱ्या मुख्य पुलावरून पाणी वाहू लागले असून,
यामुळे शहराची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
नागरिक आणि वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून,
संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता मदत व बचाव पथके तयार ठेवण्यात आली आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/gavandgaon-talav-100-bharalai-visarg-suru/