पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी नागपूर संपूर्ण भगवी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे नागपूरातील अनेक चौक भगवेमय झाले आहेत.

चौका चौकात भाजपचे झेंडे आणि भगव्या पताका उभारल्या गेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पोहचला आहे.

Related News

नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पंतप्रधानांचा ताफा जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.

उद्या ३० मार्च रोजी गुढी पाडव्याला पंतप्रधान नागपुरातच असणार आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम भरगच्च असून दिवसभर त्यांचा मुक्काम नागपूरातच असणार आहे.

यावेळी पीएम मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या नेत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे भूमीपूजन करणार आहेत.

गुढी पाडव्यानिमित्त होणाऱ्या सीमोल्लंघन आणि गुढी उभारण्याच्या सोहळ्यात मोदी सहभागी होतील.

त्यानंतर आरएसएसचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक केशव बलिराम हेडगेवार यांना ते श्रद्धांजली वाहणार आहेत.

आरएसएसमध्ये गुढी पाडव्याच्या वर्ष प्रतिपदेचे खुप महत्व असते. जो हिंदू आणि मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पंतप्रधान अभिवादन करणार आहेत.

1956 साली दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब यांनी हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत.

यापूर्वी 14 एप्रिल 2017 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीक्षाभूमी भेटीवेळी स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

गेल्यावेळी दीक्षाभूमीवर काही मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यान साधना केली होती.

त्यामुळे उद्याच्या दौऱ्यातही दीक्षाभूमीवर स्मारक समितीने पंतप्रधानांसाठी ध्यान साधनेची तयारी केली आहे.

यापूर्वी दीक्षाभूमीवर अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आले होते.

 

Related News