पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

मुंबई : देशाच्या पर्यटन आणि समुद्री क्षमतांना वेग देणारा नवा टप्पा गाठला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील इंदिरा डॉक येथे मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल (MICT) चे शनिवारी भव्य उद्घाटन झाले. देशातील हे सर्वात मोठे क्रूझ टर्मिनल असून, येत्या काळात जागतिक स्तरावर भारताला क्रूझ पर्यटनाचे केंद्र बनवण्याचा ध्यास यातून दिसून येतो.

१० लाख प्रवाशांची क्षमता, एकावेळी ५ जहाजे

४ लाख १५ हजार चौ. फूट जागेवर उभारलेले हे टर्मिनल दरवर्षी तब्बल १० लाख प्रवासी हाताळू शकते. एकावेळी ५ क्रूझ जहाजे येथे थांबण्याची सोय करण्यात आली आहे. हा प्रकल्प ५५६ कोटी रुपयांत क्रूझ भारत मिशन अंतर्गत पूर्ण करण्यात आला.

आधुनिकता आणि वारसा यांचा संगम

टर्मिनलच्या रचनेत लाटांसारखे छत, रोझ गोल्ड फिनिशिंग आणि आकर्षक इंटिरियरचा वापर करण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्री ओळखीस साजेशी अशी डिझाइन प्रवाशांना भुरळ घालणारी ठरणार आहे.

प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा

  • टर्मिनलमध्ये ७२ इमिग्रेशन व चेक-इन काउंटर असून २ लाख ७ हजार चौ. फूट जागेत प्रवाशांची जलद हालचाल शक्य होणार आहे.

  • सेल्फी पॉइंट्स, वारसा दर्शवणारे फलक, आणि आकर्षक सजावट यामुळे प्रवासाचा अनुभव संस्मरणीय होईल.

क्रूझ भारत मिशनला नवी चालना

भारताला जागतिक पातळीवर क्रूझ पर्यटनाचे हब बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. समुद्र, नदी आणि बेटांवरील क्रूझ सेवा विकसित करण्यासाठी या टर्मिनलचे उद्घाटन महत्वाचे पाऊल मानले जात आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हे केवळ एक प्रकल्प नसून, भारताच्या पर्यटन क्षेत्राला नवे उड्डाण देणारे प्रवेशद्वार ठरणार आहे.

read also :