मुंबई : मध्य रेल्वेच्या अत्यंत गर्दीच्या आणि महत्त्वाच्या कुर्ला रेल्वे स्थानकात गुरुवारी रात्री उभ्या असलेल्या एका लोकलला अचानक आग लागल्याची घटना घडली. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली असून आगीमुळे धुराचे मोठे लोळ आकाशात उठले. त्यामुळे स्थानक परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी किंवा दुखापत झालेली नाही, मात्र रेल्वे सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुर्ला रेल्वे स्थानकातील यार्डमध्ये साइडिंग लाईनवर उभी असलेली कचरा वाहून नेणारी विशेष लोकल या आगीत सापडली. ही लोकल प्रवाशांसाठी नव्हती, तर स्थानक परिसरातील कचरा उचलण्यासाठी वापरली जात होती. लोकलमधील कचऱ्याला अचानक आग लागल्याने काही वेळातच धुराचे लोळ परिसरात पसरले. स्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी धूर पाहताच घाबरून धावपळ सुरू केली.
कुर्ला हे मध्य रेल्वेचे अत्यंत वर्दळीचे स्थानक असल्याने या घटनेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, अग्निशमन दल आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जलद कारवाई करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आगीमुळे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. धुरामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण जाणवत होती. खबरदारी म्हणून काही प्लॅटफॉर्मवरील गाड्या थांबवण्यात आल्या, तर काही लोकल उशिराने धावल्या. परिणामी, मुख्य मार्गावरील लोकल सेवेला फटका बसला आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये कोणतीही आर्थिक हानी झाली नसली तरी घटनेचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यार्डमध्ये उभ्या असलेल्या गाड्या, कचरा व्यवस्थापन आणि आग प्रतिबंधक उपाययोजना याबाबत अधिक काटेकोर नियोजनाची गरज असल्याचे मत प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कुर्ला स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी आग लागण्याची घटना गंभीर मानली जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली, तरी ही घटना रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने इशारा देणारी ठरली आहे.
