वन विभागाने अडीच वर्षे पाळली गुप्तता, दुर्मिळ घटनेने वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
‘टी-३’ वाघिणीची किमया; सहाही बछडे सुदृढ असून झाले स्वयंपूर्ण
प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागात एका वाघिणीने सहा बछड्यांना जन्म देण्याची अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे.
विशेष म्हणजे, या बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचे नैसर्गिक संवर्धन व्हावे, यासाठी वन विभागाने ही गोष्ट तब्बल अडीच वर्षे गुप्त ठेवली होती.
आता हे सर्व सहा बछडे मोठे आणि सुदृढ असून, त्यांनी स्वतंत्र अधिवास शोधला आहे.
पांढरकवडा वनविभागातील ‘टी-३’ या वाघिणीने २०२२ च्या अखेरीस या सहा बछड्यांना जन्म दिला.
यापूर्वीही तिने चार आणि पाच बछड्यांना जन्म दिला होता. ३ जानेवारी २०२३ रोजी हे सहा बछडे आईसोबत पहिल्यांदा कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसले.
पर्यटकांची गर्दी आणि व्याघ्रदर्शनासाठी होणारा आटापिटा टाळून बछड्यांचे नैसर्गिक संगोपन व्हावे,
यासाठी तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी ही माहिती गुप्त ठेवली.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘एफ-२’ वाघिणीच्या बाबतीत आलेला अनुभव लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली.
राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी, ‘पाच किंवा सहा बछड्यांना जन्म देणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून,
हे उत्तम संवर्धनाचे प्रतीक आहे,’ असे म्हटले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये बिहारमधील वाल्मीकी व्याघ्रप्रकल्पात अशी घटना घडली होती.
पांढरकवड्यातील सहाही बछडे निरोगी असल्याने, हे प्रादेशिक वनविभागाच्या व्याघ्र संवर्धन प्रयत्नांचे मोठे यश मानले जात आहे.