मुंबई-आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना संयुक्त अरब अमिरातमध्ये होणार आहे. मात्र या सामन्याविरोधात देशभरातून आवाज उठत असून, उद्धव सेना रविवारी आंदोलन करणार आहे. खासदार संजय राऊत यांनी या सामन्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राऊतांचा भाजपला सवाल
“पहलगाममध्ये महिलांचं कुंकू पुसल्या गेलं, ते भाजपला विसरलं का?” असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला. त्यांनी म्हटलं की, “पहलगाम हल्ल्यात 26 निरपराध भारतीयांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश अजूनही संपलेला नाही. दहशतवादी पकडलेले नाहीत, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं चालेल? रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग खून आणि क्रिकेट कसे सोबत जाऊ शकतात?”
भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राऊतांनी भाजपच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं –
“पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानबाबत कडक भूमिका घेतली होती. कोणतेही संबंध ठेवणार नसल्याचं सांगितलं होतं. मग आता या क्रिकेट सामन्याविषयी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.”
उद्धव सेनेचं आंदोलन
संजय राऊत यांनी जाहीर केलं की, उद्धव सेनेची महिला आघाडी ‘सिंदूर रक्षा आंदोलन’ करणार आहे.
“माझं कुंक, माझा देश” या घोषणेसह महिलांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी या सामन्याला ठाम विरोध दर्शवला असून, सामना रद्द करण्याची मागणी केली आहे.
राऊतांनी या आंदोलनामागे सूतोवाच करत जय शाह यांच्यासाठीच हा सामना खेळवल्या जात असल्याचं आरोपही केले.
read also:https://ajinkyabharat.com/kunikachaya-mulacha-motha-revealed/