चंदन जंजाळ | बाळापूर तालुका वार्ता
बाळापूर (ता.प्र.) – हगामी पिकांची पेरणी पूर्ण होऊन सुमारे एक महिना उलटून गेला असला,
तरी मागील १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सुरुवातीला काही प्रमाणात पावसामुळे पिकांना चांगली उभारी मिळाली होती, मात्र आता पाणीटंचाईमुळे तीच पिके दिवसेंदिवस सुकत चालली आहेत.
मशागत झाली, पण पावसाने दांडी मारली
शेतकऱ्यांनी पेरणीनंतर शेतात मशागत, फवारणी व खतांचे नियोजन वेळेत पूर्ण केले.
मात्र नियोजनाची फळे मिळण्याऐवजी उन्हाळ्यासारख्या तापमानामुळे पिके मऊ पडू लागली आहेत.
दुपारी बऱ्याचशा पिकांना सुकलेली अवस्था येत आहे, ही गंभीर बाब आहे.
उधारीवर औषधं, कर्जाची चिंता
अनेक अल्पभूधारक शेतकरी, जसे की हात्ता येथील निलेश दामोदर, यांना पेरणीसाठी बँकेकडून किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले.
पिकांची वाढ थांबल्यास आणि उत्पादन घटल्यास हे कर्ज फेडणे कठीण होणार आहे.
“फवारणीच्या औषधांसाठी सुद्धा दुकानदारांकडून उधार घ्यावी लागते,”
असे निलेश यांनी सांगितले.
बाजारभावावरही परिणाम
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्यास झाडती कमी लागते, परिणामी उत्पादनात घट होते. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर सुद्धा मिळत नाहीत.
वरुणराजाला साकडे
या संपूर्ण पार्श्वभूमीवर बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस लवकरच पडावा, यासाठी वरुणराजाला साकडे घालत आहे.
अन्यथा या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाने लक्ष द्यावे
या स्थितीत स्थानिक प्रशासनाने आणि कृषी विभागाने तत्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदतीचे पॅकेज देणे आवश्यक आहे,
अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-te-ramambhapur-phata-rast/