कृषी मंत्र्यांना खुले पत्र ! बळीराजाच्या छाताडावर मग्रुरीचे बूट दत्तामामा, तुमचा शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत!

कृषी

कृषी मंत्र्यांना खुले पत्र !

बळीराजाच्या छाताडावर मग्रुरीचे बूट

Related News

दत्तामामा, तुमचा शेतकरी
न्यायाच्या प्रतीक्षेत!

सन्माननीय दत्ता मामा !
ज्या मातीतून पिकणाऱ्या अन्नावर जगाची भूक भागते, त्याच मातीचा पुत्र आज सरकारी अधिकाऱ्याच्या बुटाखाली तुडवला जात आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर (गोगरी) येथे घडलेली घटना (१३ जानेवारी) केवळ एका शेतकऱ्याला झालेली मारहाण नाही, तर ती लोकशाहीतील ‘ अन्नदात्या’च्या अस्मितेवर झालेला अमानवीय हल्ला आहे. आपल्याच घामाचे दाम मागायला गेलेल्या ऋषिकेश पवार या तरुण शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकारी (मंगरूळपीर ) यांनी ज्या पद्धतीने बुटाने मारहाण केली, ते पाहून माणुसकीलाही लाज वाटली असेल.

मग्रुरीचा कळस
मनरेगाच्या फळबाग लागवडीचे अनुदान आणि हक्काची मजुरी अनेक महिन्यांपासून रखडली होती. जेव्हा एखादा शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवतो, तेव्हा त्याला कायद्याचा धाक दाखवला जातो. पण जेव्हा तोच शेतकरी पुराव्यासाठी व्हिडिओ काढतो, तेव्हा एका जबाबदार अधिकाऱ्याचा संयम सुटतो आणि तो आपल्या पायातील बूट काढून शेतकऱ्यावर उगारतो? हे कोणते प्रशासन आहे? ही कोणती कार्यपद्धती आहे मामा ?

ज्या अधिकाऱ्याचा पगार हा शेतकऱ्याच्या कष्टावर आधारित “कराच्या” पैशातून होतो, त्याच अधिकाऱ्याची इतकी मग्रुरी की त्याने ‘ पोशिंद्या’लाच तुडवावे ? या वादग्रस्त अधिकाऱ्याचा इतिहास आधीच कलंकित असताना, त्याला पुन्हा या पदावर बसवून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचा परवाना दिला कुणी, हा मूळ प्रश्न येथे उपस्थित होत आहे मामा.

पालकमंत्री महोदय, हा तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे!
राज्याचे कृषिमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मामा आपल्यासाठी ही घटना म्हणजे आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. मामा, तुम्ही संवेदनशील आहात, आक्रमक आहात आणि सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेले नेते आहात. म्हणून आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत मामा.
जर अशा माजलेल्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मामा हे लक्षात असू द्या.
हा केवळ ऋषिकेश पवारचा अपमान नसून महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक कष्टाळू हाताचा अपमान आहे.
डोळ्यात अंजन घालणारे वास्तव
प्रशासनात बसलेल्या पांढरपेशा साहेबांना हे लक्षात आले पाहिजे की, शेतकरी जर शांत आहे तर तो त्याचा संस्कार आहे, हतबलता नाही. कृषी विभागाने शेतकऱ्याला मदत करणे अपेक्षित असताना, तिथे ‘बूट’ उगारले जात असतील, तर हे राज्य पुरोगामी म्हणायची लायकी आपण हरवून बसलो आहोत. असे आम्हाला दुर्दैवाने म्हणावे लागत आहे मामा.

दत्तामामा , तुमच्या ‘आक्रमक’ शैलीची खरी गरज आता आहे. त्या अधिकाऱ्याच्या पायातील बूट नव्हे, तर तुमच्या अधिकाराचा बडगा त्याच्या मग्रुरीवर पडला पाहिजे. जर या घटनेत दोषीला कडक शिक्षा झाली नाही, तर हा अन्याय सहन करणारा बळीराजा उद्या सत्तेच्या खुर्चीलाही खाली खेचायला मागेपुढे पाहणार नाही.” हे लक्षात असू द्या !

शासन आता गाढ झोपेतून जागे होणार की या ‘बुटाच्या डागा’ला आपल्या कपाळावर घेऊन फिरणार? याकडे संपूर्ण राज्याचे डोळे आता पालकमंत्री आणि राज्य सरकारकडे लागली आहेत. ​”कलंकित इतिहास असलेल्या अधिकाऱ्याची शेतकऱ्यावर हात (आणि बूट) उगारण्याची हिंमत होतेच कशी ? दत्तामामा, बळीराजा आता केवळ आश्वासनांनी शांत होणार नाही!”
न्याय हवाय… तो ही तात्काळ आणि कठोर !

धनंजय कपाले
(राजकीय, गुन्हेगारी आणि
सामाजिक अभ्यासक, वाशिम )
09822724466

read also :  https://ajinkyabharat.com/tremendous-benefits-of-moringa-powder-miraculous-superfood-revolutionary-mantra-for-health-and-fitness-10-powerful-benefits/

 

Related News